संत तुकाराम महाराज पालखीचे तोफांच्या सलामीत होणार स्वागत | पुढारी

संत तुकाराम महाराज पालखीचे तोफांच्या सलामीत होणार स्वागत

अकलूज : रवी शिरढोणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे पालखी सोहळ्यात सेवा करण्यास अकलूजकर मुकले होते. ती हुरहुर त्यांच्या मनी होती. यावर्षी मात्र पुन्हा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताची अकलूजकरांनी जय्यत तयारी केली आहे. याठिकाणी तोफांच्या सलामीत पालखीचे स्वागत केले जाते. पुणे जिल्ह्यातील सराटी येथील शेवटचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज येथे आज (मंगळवारी) येत होते. अकलूज आणि सराटी या दोन गावांतील अंतर केवळ तीन किलोमीटर आहे. दुसर्‍या दिवशीचा मुक्काम अकलूज येथे असल्याने व अकलूज येथे सुविधा असल्याने हजारो वैष्णव आदल्या दिवशीच अकलूजला मुक्कामी येतात. त्यामुळे अकलूजकरांना पालखी सोहळ्यातील वैष्णवांची दोन दिवस सेवा करण्याची संधी मिळते.

पालखी सोहळ्यातील भाविकांना परिसरातील सहकारी, सामाजिक संस्था, विविध नवरात्र व गणेश मंडळांकडून अल्पोपहार, भोजन दिले जाते. दर्शन व्यवस्थेसाठी स्वयंसेवक चोख भूमिका बजावतात. या दोन दिवसात चौका चौकात होणारे भजन, भारुड, कीर्तन यांनी अकलूजनगरी भक्‍तिरसात तल्लीन होऊन जाते. घरोघरी विविध दिंड्यातील वैष्णवांना मिष्टान्न भोजन देण्याची परंपरा आहे. या सोहळ्यासाठी अकलूजकर जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन वैष्णवांच्या सेवेत रममाण होतात. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील तिसरे व सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर आज (मंगळवारी) होणार आहे. याकरिता शिक्षण प्रसारक मंडळ व अकलूज नगरपरिषद विशेष नियोजन करते. मैदानावर शिक्षण प्रसारक मंडळाचे 200 विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सेवा देतात.

मैदानाच्या मधोमध गोल बॅरेकेटिंग करून मैदानावर मधोमध पालखी विसावा मंडप उभारलेला आहे. या ठिकाणी आरती होऊन नियोजन पद्धतीने रिंगण सोहळा साजरा होतो. लाखो वैष्णवांना या रिंगण सोहळा पाहता यावा. यासाठी व्यवस्था केली जाते. सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर दिवसभर पालखी सोहळा भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध असतो. विठू नामाचा गजर करीत भक्तीरसात तल्लीन झालेल्या लाखो वैष्णवासह अकलूजकरांच्याही उत्साहाला यानिमित्ताने उधाण येते.

नीरा नदीपात्रात पादुकांना स्नान

अकलूज परिसरात सलग दोन दिवस या पालखी सोहळ्यामुळे उत्साही व धार्मिक वातावरण असते. पुणे व सोलापूर जिल्ह्याची सीमा असणार्‍या नीरा नदी पात्रात श्री तुकोबारायांच्या पादुकांना निरास्नानही मोठ्या उत्साहात घातले जाते. अकलूजच्या सीमेवर पालखी सोहळ्याच्या स्वागताला तोफांची सलामी दिली जाते.

Back to top button