पंढरपुरात विठू-रखुमाईचे 24 तास दर्शन सुरू | पुढारी

पंढरपुरात विठू-रखुमाईचे 24 तास दर्शन सुरू

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आषाढी वारीच्या निमित्ताने वाढती गर्दी लक्षात घेता आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व तत्पर होण्याच्या द‍ृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत शुक्रवारपासून (दि. 1 जुलै) ‘श्रीं’चे दर्शन 24 तास सुरू ठेवण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 10 जुलै रोजी साजरा होणार आहे.त्यासाठी वारीनिमित्त पायी पालखी सोहळ्यासोबत परराज्यांतील तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत पंढरपुरात सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून ‘श्रीं’चा पलंग काढून भाविकांसाठी दि. 1 ते 18 जुलै या कालावधीत 24 तास दर्शन सुरू ठेवले आहे.

त्याअंतर्गत शुक्रवारी सकाळी देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. यावेळी विठ्ठल मूर्तीस मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्क्या लावण्यात आला आहे. आजपासून विठ्ठल-रुक्मिणीमातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (दि.18 जुलै) बंद राहतील. या कालावधीत श्री ची नित्यपूजा, महानैवद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरु राहतील. नित्योपचाराची वेळ वगळता श्रींचे पददर्शन 22.15 तास सुरु राहील. तसेच मुखदर्शन 24 तास सुरु राहील, असे गुरव यांनी सांगितले.

श्रींचे दर्शन 24 तास सुरू केल्याने आता दररोज 40 ते 45 हजार भाविकांना पददर्शन होणार आहे, तसेच 50 ते 55 हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत दररोज एक लाख भाविक दर्शन घेत असतात. या कालावधीत श्री चे 24 तास दर्शन सुरू केल्याने भाविकांना कमी अवधीत दर्शन होणार आहे. यावेळी मंदिर समितीचे सह. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह. भ. प. प्रकाश जवंजाळ, ह. भ. प. शिवाजी मोरे, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button