सोलापूर : 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर उद्यापासून बंदी | पुढारी

सोलापूर : 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर उद्यापासून बंदी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबतच्या नियमावलीत सुधारणा केली आहे. यानुसार उद्या 1 जुलैपासून 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी राहणार आहे. सोलापूर शहरात महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नवीन नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्लास्टिक पर्यावरणास हानीकारक असून, प्रदूषणामध्ये मोठी भर पाडणार्‍या आहेत. सन 2016 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत सर्वप्रथम कायदा केला होता. एकदाच वापर करून फेकणार्‍या प्लास्टीकला सिंगल युज प्लास्टिक असे संबोधले जाते.

राज्य शासनाच्या कायद्यानुसार सुरुवातीला 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे कॅरिबॅग, वॉटर पाऊच, जेवणाचे ताट, ग्लास आदींवर बंदी घालण्यात आली होती. असे प्लास्टीक पर्यावरण, प्रदूषणास घातक असल्याने त्याच्या उत्पादन, विक्री व वापरात बंदी घातली गेली. महाराष्ट्रात याची अंमलबजावणीस सुरुवात झाल्यावर सन 12 ऑगस्ट 2021 रोजी केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. यानुसार 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. याची अंमलबजावणी 30 सप्टेंबर 2021 पासून करण्यास सुरुवात झाली होती. केंद्राने आता या नियमावलीत बदल करुन येत्या 1 जुलैपासून 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे.

दरम्यान, शहरात महापालिकेकडून सातत्याने प्लास्टिक संदर्भात कारवाईची मोहीम घेतली जाते. एखाद्या व्यापारी, विक्रत्याकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास पहिल्यावेळी पाच हजारांचा दंड केला जातो. याच विक्रेत्याकडे दुसर्‍यावेळी प्लास्टिक आढळल्या 10 हजारांचा दंड आकाण्यात येतो. तिसर्‍यावेळी मात्र 25 हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. महापालिकेने आतापर्यंत एखाद्या व्यापारी, विके्रत्यावर दोनवेळा कारवाई केल्याचे दिसून येते. तिसर्‍यांदा कारवाई झाल्याचे अद्याप एकही उदाहरण नाही. यावरुन प्लास्टिक विरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नसल्याची पर्यावरणप्रेमींची ओरड आहे. तिसर्‍यावेळची कारवाई झाल्यास त्याचा मोठा संदेश व्यापारी, विक्रेत्यांमध्ये जाऊन प्लास्टिकचा वापर टाळला जाणार आहे.

या विविध 19 वस्तूंवर राहणार बंदी

सिंगल युज प्लास्टिक बंदीसंदर्भात सुधारित नियमांतर्गत आता 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टीचे कॅरीबॅग, स्ट्रॉ, कप, काड्या, ग्लास, चमचे, काटे, चाकू, मिठाई बॉक्स, सिगारेट पाकीट, निमंत्रण पत्रिकांवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या फॉईल, पॉलिस्टीरीन वस्तू आदींचा समावेश आहे.

लवकरच आणखी बंदी येणार

सन 2022 मध्ये प्लास्टिक हद्दपार करण्याचा केंद्राचा संकल्प आहे. त्यानुसार यासंदर्भातील नियम टप्प्याटप्प्याने कडक करण्यात येत आहेत. 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी आणण्याचे केंद्राने घोषित केले आहे.

Back to top button