निर्जला एकादशी : भाविकांनी फुलली पंढरी | पुढारी

निर्जला एकादशी : भाविकांनी फुलली पंढरी

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आषाढी यात्रा निर्बंधमुक्तपणे साजरी करण्यात येणार असल्यामूळे मानाच्या पालख्यांसह असंख्य पालख्या, दिंड्यांनी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमन सुरू केले आहे. त्यामुळे आषाढी यात्रेची भाविकांमध्ये उत्सुक्ता आहे. त्याचबरोबर शनिवारी साजरी झालेल्या निर्जला एकादशीलाही लाखो भाविकांनी हजेरी लावत एकप्रकारे वारीच पोहोचती केल्याचे चित्र दिसून येत होते. निर्जला एकादशीला आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग फुलून गेला होता.

सद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत आहेत. यातच आज शनिवार असल्याने वीकेंडला मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर शनिवारी निर्जला एकादशी आल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत एकप्रकारे वारीच पोहोचती केली आहे. आषाढी यात्रेत 15 लाखांच्या आसपास भाविक पंढरीत येतात. त्यामूळे पदस्पर्श दर्शन भाविकांना मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे अनेक भाविक आषाढी यात्रेच्या पूर्वीच श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणे पसंद करतात. त्यामुळेच शनिवारी साजरी झालेल्या (निर्जला) भागवत एकादशीला लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे मंदिर परिसर फुलून गेले होते. तर प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग, स्टेशन रोड या ठिकाणी देखील भाविकांनी गर्दी दिवसभर दिसून येत होती. तर पंढरीत आलेल्या भाविकांनी प्रथम चंद्रभागा स्नान करण्यास पसंती देत असल्याने चंद्रभागा वाळवंटही फुलून गेले होते.

चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी पदस्पर्श दर्शनाबरोबरच मुख दर्शन घेण्यावर भर दिला. एस.टी. बससेवा सुरू झाली असल्याने मोठ्या संख्येने भाविक पंढरीत येत आहेत. तर एकादशीला आलेल्या भाविकांनीं प्रासादिक साहित्य खरेदी करण्यासही प्राधान्य दिल्याने बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे. बाहेरून आलेल्या बहुतांश भाविकांनी दर्शन रांगेत उभा राहून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणे पसंत केले. तर दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी पुरवण्यात आले.

चंद्रभागेत स्नानासाठी पुरेसे पाणी

निर्जला एकादशीसाठी आलेल्या भाविकांनी शनिवारी चंद्रभागा स्नानास पसंती दिली. चंद्रभागेत पुरेसे पाणी असल्याने भाविकांनीं स्नानाचा मनमुराद आनंद घेतला. त्याचबरोबर अनेक भाविक चंद्रभागेत बसून फराळाचा बेत करत एकादशीचा उपवास सोडत होते. भाविकांच्या उपस्थितीने चंद्रभागा वाळवंट फुलून गेले होते.

Back to top button