अक्कलकोट पर्यटनाचे निवासस्थान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत | पुढारी

अक्कलकोट पर्यटनाचे निवासस्थान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा येथील म्हाडा कॉलनीलगत पर्यटन विकास महामंडळाकडून बांधण्यात आलेले अद्ययावत रिसॉर्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या या रिसॉर्टच्या चोहोबाजूंनी मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. या इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रशासनाकडून ‘तारीख पे तारीख’ पडत आहे. ही इमारत वापरात कधी येणार, असा प्रश्न स्वामीभक्त व शहरवासीयांतून होत आहे. राज्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याकरिता, तीर्थस्थळे विकसित होण्याकरिता राज्य शासनाकडून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्याच्या विविध जिल्ह्यांत महामंडळाचे रिसॉर्ट अद्ययावत बांधण्याकामी प्राधान्य देण्यात आले.

त्याप्रमाणे महामंडळाचे राज्यात कामदेखील झाले. दरम्यान, कोव्हिड-19 च्या काळात बंद ठेवण्यात आले. त्यानंतरच्या काळात सुरू करण्यात आले. याकाळातच अक्कलकोट येथील रिसॉर्टची अंतर्गत कामे अर्धवट राहिली. त्यानंतर हे काम पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्याने महामंडळाकडून उद्घाटन करण्याकामी कार्यवाही सुरू झाली. मात्र, उद्घाटन होऊ शकले नाही. यास वर्ष उलटूनही अद्याप याचे उद्घाटन रखडलेले आहे. उद्घाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ पडत असल्यामुळे भाविकांसह नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता गेल्या महिन्याभरात सतत भाविकांची गर्दी वाढत गेल्याने अनेक भक्तांना निवासस्थान न मिळाल्याने त्यांना सोलापूरसह नजिकचे तीर्थक्षेत्र गाठावे लागले. काही भक्तांनी तर खासगी होम स्टे केले. श्री वटवृक्ष देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांचे भक्तनिवास, यात्रीनिवास, यात्रीभवन यासह भक्तांना मुक्कांमाकरिता देवस्थान व न्यासाच्या सर्व सुविधा हाऊसफुल्ल झाल्याने भक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट हे संपूर्णत: सज्ज असताना लोकार्पण सोहळ्याकरिताचा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून ‘तारीख पे तारीख’च्या प्रतीक्षेत असल्याने रिसॉर्टला काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. संपूर्ण इमारतीत अंतर्गत बाजूने घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. रिसॉर्ट रूममध्ये टीव्ही संच, बेडसुविधा, विविध सोयी या करूनही धूळखात असून भिंतींवर जाळीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालून त्वरित धूळखात असलेल्या इमारतीचे लवकरच लोकार्पण करण्याची मागणी स्वामीभक्त व शहरवासीयांतून होत आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी पाहता राज्य शासनाचे निवासाकरिता एकही दालन नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे विश्रामधाम असून नसल्यासारख्या अवस्थेत, तर नगर परिषदेचे येथील व्यापारी संकुल इमारतीत असलेले भक्तनिवास हे निविदा काढण्यात येऊनही घेणार्‍याने ताबा न घेतल्याने या निवासातदेखील घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.

अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र ठिकाण आहे. त्यामुळे येथे देशभरातून भाविकांसह नेते स्वामींच्या दर्शनासाठी येतात. पर्यटन विकास महामंडळाकडून कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले रिसॉर्ट सध्या धूळखात पडून आहे. या इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करून वापरात आणावे.
– अण्णा वाल्हेकर, उद्योगपती, पुणे

Back to top button