पंढरपूर : संचारबंदीविरोधात व्यापार्‍यांचे घंटानाद आंदोलन | पुढारी

पंढरपूर : संचारबंदीविरोधात व्यापार्‍यांचे घंटानाद आंदोलन

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : पंढरपुरात शहर व ग्रामीण असा वेगळा निकष न लावता संचारबंदी लादली जात आहे. त्याविरोधात पंढरपूरात व्यापारी महासंघ व हॉटेल व्यावसायिक यांच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन केले.

पंढरपूर शहरात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात असतानाही ग्रामीण भागाच्या रुग्ण संख्या विचारात घेऊन शहरवासीयांना वेठीस धरल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला. याविरोधात उद्या (बुधवारी) अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी 13 ऑगस्टपासून शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळून पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश काढले आहेत. याला व्यापार्‍यांनी जोरदार विरोध केला आहे. व्यापार्‍यांनी विरोध करण्यासाठी शहरात रस्त्यावर येत मंगळवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घालत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घंटानाद आंदोलन केले.

किमान यानंतर तरी सरकारला जाग यावी, म्हणून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि घंटानाद आंदोलन करत असल्याची भूमिका व्यापार्‍यांनी मांडली. संतप्त व्यापार्‍यांनी सलग तीन दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी शहरात अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे, तर 13 रोजी सविनय कायदेभंग करत लॉकडाऊनचे आदेश झुगारून सर्व व्यापारी आपआपली दुकाने उघडी ठेवणार आहेत. यावेळी दुकानांवर काळे झेंडे लावण्यात येणार आहेत.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यजित मोहोलकर म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण शहरात अत्यल्प असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने शहरावर लॉकडाऊन लादला आहे. तो मागे घ्यावा, अन्यथा आम्ही आदेश डावलून व्यापारपेठ खुली करू.

घंटानाद आंदोलन प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळ कर, संजय भिंगे, दिपक शेटे, सोमनाथ डोंबे, राजगोपाल भट्टड, दिगंबर गडम, दिलीप व्होरने, बाळासाहेब सासवडे, विजय खंडेलवाल, संतोष कवडे, दत्तसिंह राजपूत, राजू कपडेकर,वैभव यवनकर, प्रकाश डोळ, प्राजक्ता बेणारे,सोमनाथ आवताडे , किरणराज घाडगे, प्रणव परिचारक, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी, हॉटेल व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.तहसिलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.

आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

आंदोलनाचा भाग म्हणून मंगळवारी व्यापार्‍यांच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी सोलापूर यांना जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन केले.आज अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. तर दि. 12 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारीविरोधात प्रशासन असा वाद पेटतो की तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button