सोलापूर : कापूस दरातील अनियंत्रित दरवाढीमुळे सूत गिरण्या संकटात | पुढारी

सोलापूर : कापूस दरातील अनियंत्रित दरवाढीमुळे सूत गिरण्या संकटात

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : कापूस दरात झालेल्या अनियंत्रित दरवाढीमुळे महाराष्ट्रातील सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. देशात कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातच व्यापार्‍यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याने कापसाच्या दरात भरमसाठ वाढ केली जात आहे. याचा परिणाम येत्या काही दिवसांत सूत गिरण्या काही काळासाठी बंद ठेवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली असून यास स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी यास दुजोरा दिला आहे.

सध्या खुल्या बाजारात कापसाचा दर विक्रमी असा एक लाख दहा हजार प्रतिखंडी झाला आहे. केंद्र सरकारने कापूस उत्पादन शेतकर्‍यांसाठी कापसाचा हमीभाव प्रति क्विंटल 6 हजार 50 रुपये असा ठरवून दिला आहे; परंतु खुल्या बाजारात शेतकर्‍यांना व्यापार्‍यांकडून 13 हजार दर मिळत असल्याने शेतकरी आपला कापूस खासगी व्यापार्‍यांना विकत आहेत.

काही दिवसात पावसाळा सुरु होत असल्याने शेतकर्‍यांनी सगळा कापूस विकून संपवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडे कापूस शिल्लक नाही. सूत गिरणी व्यवस्थापन कापूस खरेदीसाठी बाजारात फिरत आहेत. परंतू कापसाची प्रचंड टंचाई जाणवत आहे. सध्या सूतगिरण्यानकडे आठ दिवस पुरेल इतकाच कापूस शिल्लक आहे. ही परिस्थिती बदलेल, अशी स्थिती सध्यातरी दिसून येत नाही. त्यामुळे नजिकच्या काळात योग्य दरात कापूस मिळेल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे सूत गिरण्या पुढील काही काळाकरीता बंद ठेवावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्यातील ग्रामीण भागात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देणार्‍या या सहकारी सूतगिरण्यांना या संकट काळात शासनाचे पाठबळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.

अनेक राज्यांतील सूतगिरण्या बंद

कापसाच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी भागातील सूतगिरण्या बंद ठेवल्या आहेत. कापसाचे नवीन उत्पादन येईपर्यंत सूतगिरण्या बंद ठेवल्या जाणार आहेत. या धर्तीवर महाराष्ट्रातील सहकारी व खासगी सूतगिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी अनेक सूतगिरण्यांच्या चालकांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्याकडे केली आहे.

Back to top button