दक्षिण सोलापूर : दोन चिमुकल्यांसह मातेची आत्महत्या | पुढारी

दक्षिण सोलापूर : दोन चिमुकल्यांसह मातेची आत्महत्या

दक्षिण सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : तिल्हेहाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथील सोनाली सिद्राम चोपडे (वय 30) येथील महिलेने आलेगाव येथे विहिरीत दोन मुलांसह आत्महत्या केली. बुधवारी (दि. 11) हा प्रकार उघडकीस आला. संतोष सिद्राम चोपडे (वय 8) व संदीप सिद्राम चोपडे (वय 5) अशी मृत मुलांची नावे आहेत. वळसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून काढून शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोनालीचे पती सिद्राम ऊर्फ गोटू चोपडे यांची आलेगाव शिवारात शेती आहे. ते आपल्या कुटुंबासह शेतातील वस्तीवर राहतात. सिद्राम हे मोलमजुरी करतात, तर सोनाली देखील शेळ्या राखणे, मजुरीची कामे करत होती. मोठा मुलगा संतोष हा दुसरीत शिकत, तर लहान संदीप हा अंगणवाडीत जात होता.

सिद्राम हा मंगळवारी मजुरीसाठी कामावर गेला होता, तर मुले शाळेच्या सुट्टीमुळे घरीच होती. आईसोबत संतोष व संदीप नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सोनाली व मुले परत आली नव्हती. त्यामुळे पती सिद्राम यांच्यासह नातेवाईक, शेजार्‍यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, सोनालीने नेलेल्या शेळ्या जवळच्याच दयानंद शिंदे यांच्या शेतात जाऊन चरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिंदे यांनीही सिद्रामसह नातेवाईकांना कळविले. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध सुरू होती. पण कोणीच हाती लागले नाहीत.

सकाळी पुन्ंहा शोधाशोध करीत असताना दयानंद शिंदे यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला संतोष आणि संदीप यांच्या डोक्यावरील टोपी आणि पायातील चपला अढळून आल्या. यामुळे सिद्रामसह नातेवाईकांनी तेथे जावून पाहिले असता विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आले. शिंदे यांनी तत्काळ याची वळसंग पोलिसात वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. ते मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. दोन छोटया चिमुकल्यांसह सोनालीने आपली जीवन यात्रा संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत

शेळ्यांमुळे लागला तपास

सोनालीने शेळ्या चारण्यासाठी शेतात नेल्या होत्या. त्या शेळ्या शिंदे यांच्या शेतात चरत असल्याने कळविले. त्यानंतर पुन्हा शिंदे यांच्या शेतात टोपी, चपला आढळून आल्या त्यामुळे सोनालीने आपल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

Back to top button