सांगली-सोलापूर महामार्गामुळे पर्यटनाला चालना | पुढारी

सांगली-सोलापूर महामार्गामुळे पर्यटनाला चालना

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गाचे 166 चे काम वेगाने सुरू झाले आहे. या 210 कि.मी.पैकी जवळपास 95 टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या चौपदरीकरणाच्या कामासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या 97 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता आता प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्राला थेट मराठवाड्याशी जोडणारा दुवा म्हणून हा रस्ता पुढे येणार आहे.

सांगली ते बोरगाव या 41 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू झाले होते. त्यासाठी 1002 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. दुसर्‍या टप्प्यात बोरगाव ते वाटंबरे हा 52 कि.मी.चा रस्ता मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी 1025 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. उर्वरित वाटंबरे ते मंगळवेढा या 45 कि.मी.च्या रस्त्यासाठी 957 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. चौथ्या टप्प्यात मंगळवेढा ते सोलापूर या 56 कि.मी.च्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी 1141 कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले आहे.

अनेक ठिकाणची कामे 97 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांपैकी काही ठिकाणी विजेची, तर काही ठिकाणी जोड रस्ता आणि पुलांची कामे प्रलंबित आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत ही कामे तातडी पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुहास चिटणीस यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर सर्वसामान्य लोकांसाठी हा रस्ता पूर्ण क्षमतेने खुला केला जाणार आहे.

हा रस्ता पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्राला थेट मराठवाड्याशी जोडणारा हा दुवा ठरणार आहे. यामुळे कृषी पर्यटन क्षेत्राला मोठी संधी मिळणार आहे. साखर उद्योग, व्यापार आणि तीर्थक्षेत्र विकासालाही या रस्त्यामुळे चालना मिळणार आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी ते तुळजापूरची तुळजाभवानीमाता या तीर्थक्षेत्राला जोडणारा हा महामार्ग लवकरच पूर्ण होणार असल्याने प्रवाशांसह व्यापारी, उद्योगपती, शेतकरी व पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे. प्रवासाचे अंतर कमी झाले नसले तरी प्रवासाचा वेळ मात्र वाचणार आहे.पूर्वी 4 ते 5 तास लागणारा हा रस्ता आता अडीच ते 3 तासांच्या प्रवासात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नाशवंत कृषिमाल वेळेत विविध बाजारपेठांत दाखल करता येणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासाचा खरा राजमार्ग हा रस्ता ठरणार आहे.

महामार्गाचे जवळपास 97 टक्के काम पूर्ण

सोलापूर-सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील सांगोल्यातील रेल्वे क्रॉसिंगचे काम सध्या प्रलंबित आहे. त्यासाठी रेल्वेकडून परवानगी मागितलेली आहे. रेल्वे विभागाकडून काम करण्यासाठी ब्लॉक मिळाल्यानंतर त्याठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचा पूल तातडीने बांधण्यात येणार आहे. इतर काही ठिकाणी विजेची कामे बाकी आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर सांगली- सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुहास चिटणीस यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा

Back to top button