सोलापूर: पाझर तलावात बुडल्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू | पुढारी

सोलापूर: पाझर तलावात बुडल्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मोहोळ (जि. सोलापूर) , पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्‍यातील एकुरके गावात बहिणी सोबत चार वर्षीय चिमुकला खेळायला गेला. खेळत असताना पाझर तलावात बुडाल्याने त्‍याचा मृत्यू झाला. ही घटना आज रोजी दुपारी दोन च्या सुमारास गावच्या शिवारात घडली. कुणाल कुंदन मोरे (रा. मोडनिंब, ता. माढा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, माढा तालुक्यातील प्रियंका व कुंदन मोरे हे त्यांच्या दोन मुली व लहान मुलगा यांच्यासह गेल्या एक महिन्यापासून एकुरके तालुका मोहोळ येथे अरविंद भारत जौजंट यांच्याकडे राहत आहेत. दरम्यान आज दुपारी दोन च्या दरम्‍यान प्रियंका व कुंदन मोरे यांचा मुलगा कुणाल मोरे (वय 4 वर्षे) हा त्याची बहीण रेणुका मोरे हिच्यासह घराशेजारी असणाऱ्या पाझर तलावाजवळ खेळत होते.

खेळत खेळत पाण्यात गेल्यामुळे तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती रेणुका हिने धावत जाऊन मामा अरविंद जौजंट व आई प्रियंका मोरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तलावाकडे धाव घेतली. यावेळी चिमुकला कुणाल तलावाच्या पाण्यात तळाला आढळून आल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी मयत कुणालचे मामा अरविंद भारत जौजंट (रा.एकुरके) यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या जबाबावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुरेश पोपळे हे करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे एकुरके व मोडनिंब परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button