सोलापूर : शाळा बंद, ४० हजार शिक्षक शाळेत; ८ लाख विद्यार्थी घरात | पुढारी

सोलापूर : शाळा बंद, ४० हजार शिक्षक शाळेत; ८ लाख विद्यार्थी घरात

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने राज्य शासनाने बारावीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील 40 हजार शिक्षक शाळेत, तर सुमारे आठ लाख विद्यार्थी घरी बसून राहिले आहेत. नव्या निर्बंधामुळे पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला आहे. परीक्षेबाबतही पालक व विद्यार्थ्यांत पुन्हा मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडूनही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. अचानक शाळा बंद झाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना पुन्हा हुरहूर लागली आहे.

लसीकरण मोहिमेमुळे कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर दिवाळीनंतर शाळा व महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने मागील वर्षी घेतला. त्यानुसार सुरुवातीला महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर पाचवीपासून वर्ग सुरू करण्यात आले. महिन्याभरापासून पहिलीपासून शाळा सुरक्षित वातावरणात सुरू करण्यात आली होती. तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शाळेची घंटा वाजल्याने पालक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला होता. मात्र महिन्याभरातच पुन्हा ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व पालकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. शिक्षकांतूही याबाबत नाराजीचा सूर दिसून येत आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे केवळ ऑनलाईन प्रणालीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला. त्यामुळे परीक्षा न घेताच नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचाही ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळाला असला तरी ऑनलाईन प्रणालीच्या शिक्षणामुळे मुलांची गुणवत्ता ढासळली, असे मत शिक्षक व पालकांचे आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर 95 टक्क्यांपेक्षा जास्त पालकांनी शाळेतच मुलांना शिक्षणासाठी पाठविण्याची भूमिका घेतली.

ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही परिस्थिती अशीच राहिली, तर कदाचित सलग तिसर्‍या शैक्षणिक वर्षातील परीक्षाही न होण्याची दाट शक्यता शिक्षकांतून व्यक्‍त होत आहे. परीक्षा न घेताच मुलांना उत्तीर्ण करण्याचा प्रकार पालकांनाही आता नकोसा वाटू लागला आहे. त्यामुळे राज्य शासन याबाबत काय निर्णय घेणार, याची उत्सुकता पालकांना व शिक्षकांना आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश काढून सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारपासून शाळेतील मुलांची वर्दळ थांबली आहे. शाळेत सर्व शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेत हजर राहूनच शिक्षक ऑनलाईन तास मुलांचा घेत आहेत. ही परिस्थिती आणखीन किती दिवस असणार, याबाबत मात्र शंका उपस्थित होत आहे.

शाळा सुरू व्हावी हीच पालकांची अपेक्षा

ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने अचानक शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय बहुतांश पालकांना रुचला नाही. पालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांचेही लसीकरण होत आहे. मुलांची शैक्षणिक गुणवत्ताही महत्त्वाची असून सुरक्षित वातावरणात शाळा भरावी, अशी प्रतिक्रिया पालक किरण राजगुरू यांनी दिली.

दहावी, बारावीची एकदिवसाआड शाळा

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार तूर्त शाळा बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा महत्त्वाच्या असल्याने या दोन्हींसाठी एकदिवसाआड वर्ग भरविण्यात येत आहेत. पहिली ते अकरावीचा अभ्यासक्रम ऑनलाईन प्रणालीने पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : काठीच्या आधारे पाण्यासाठीचा हा जीवघेणा संघर्ष

Back to top button