किरीट सोमय्या म्हणाले, अजित पवारांविरोधात आज ‘ईडी’कडे पुरावे - पुढारी

किरीट सोमय्या म्हणाले, अजित पवारांविरोधात आज ‘ईडी’कडे पुरावे

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या बहिणी, त्यांचे मेहुणे हे जरंडेश्वर साखर कारखान्यात भागीदार आहेत. एवढेच नव्हे, तर अजित पवार यांच्या बेहिशेबी 70 मालमत्ता उघडकीस आल्या आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात सर्व पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय, सीबीआयला उद्या देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार ही संगनमताने केलेली दरोडेखोरी आहे, अशी टीका त्यांनी केली. या दरोडेखोरांना मी सोडणार नाही. त्यांना जनतेसमोर उघडे करू, अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली. सोमय्या रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी शांतिसागर मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबीय व महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला.

सोमय्या म्हणाले, अजित पवारांच्या बेनामी मालमत्तेत बहिणी व मेहुण्यांचा हिस्सा आहे. वास्तविक अजित पवार, शरद पवार म्हणत आहेत की, बहिणींचा काही संबंध नसताना ईडी चौकशी करीत आहे. मात्र, अजित पवारांच्या बहिणी नीता पाटील, वीणा पाटील आणि त्यांचे मेहुणे मोहन पाटील हे जरंडेश्वर कारखान्यात कागदोपत्री भागीदार आहेत. त्यातील गैरकारभाराबाबत साहजिकच त्यांचीही जबाबदारी निश्चित होते. त्यामुळे तुम्ही कुणाशी बेईमानी करीत आहात? ही बेईमानी बहिणीशी की महाराष्ट्रातील जनतेशी, अशी विचारणाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी हाताला धरून मुख्यमंत्री बनविले, असे आता सांगत आहेत. एकूणच ठाकरे सरकारचे ते रिमोट कंट्रोल आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी नव्हे वसुली सरकारच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे उघड आहेत. अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार मी उघड केले आहेत. त्याप्रकरणी ईडीकडून चौकशीही सुरू आहे. असे असताना ईडीचा गैरवापर केल्याचे आरोप करीत शरद पवार भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करीत आहेत.

भावनिक मुद्दे करून जणू काही घडलेच नाही, असा बनाव करीत आहेत. वास्तविक, महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार म्हणजे सामुदायिक दरोडेखोरीच आहे. या दरोडेखोरीचे सर्व पुरावे माझ्याकडे असून ते ईडी, उच्च न्यायालय, सीबीआयकडे उद्या सादर करणार आहे. या पत्रकार परिषदेस महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.

पवार कुटुंबीयांना उघड आव्हान

सोमय्या म्हणाले, पवार कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्याचे चोपडे मी उद्या ईडी, इन्कमटॅक्सला तसेच केंद्रीय सहकार न्यायालयालाही पाठविणार आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांनी माझा त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा दावा खोटा करून दाखवावा. एवढेच नव्हे, तर 70 बेहिशेबी मालमत्ता आहेत त्या अजित पवार परत करणार का, हेही शरद पवार यांनी स्पष्ट करावे.

Back to top button