तांबवे येथे दगडाने ठेचून मित्राचा खून - पुढारी

तांबवे येथे दगडाने ठेचून मित्राचा खून

माळीनगर ; पुढारी वृत्तसेवा : तांबवे (ता. माळशिरस) येथे मद्यप्राशन करताना झालेल्या भांडणातून दोघा भावांनी प्रदीप माणिक वाळेकर (वय 40, रा. तांबवे, ता. माळशिरस) याचा दगडाने ठेचून खून केला. सोमवारी (दि. 30) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

खून केल्या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जितेंद्र सुखदेव चव्हाण, रघुनाथ सुखदेव चव्हाण (दोघे रा. तांबवे) यांना अटक करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, प्रदीप वाळेकर, जितेंद्र व रघुनाथ चव्हाण हे तिघे मित्र होते. प्रदीप हे रवींद्र रावसाहेब इनामदार यांच्या शेतात कामाला गेले होते.

दरम्यान, ते तिघेजण सोमवारी लक्ष्मण चव्हाण यांच्या शेतातील नारळाच्या झाडाखाली बसून तिघांनी मद्यप्राशन केले. त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चेतून भांडण सुरू झाले.

त्यावेळी जितेंद्र चव्हाण व रघुनाथ चव्हाण यांनी प्रदीप वाळेकर यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. मात्र तिघेही दारुच्या नशेत असल्याने प्रदीपला किती मारतोय हे समजले नाही. जोरात मार लागल्याने प्रदीप वाळेकर याचा जागीच रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत प्रदीप वाळेकर घरी आला नव्हता. त्याबाबत चौकशी करता त्याचा मृतदेह आढळून आला.

याबाबत लालासाहेब नामदेव वाळेकर(रा. तांबवे) यांनी अकलूज पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत.

Back to top button