माळशिरस-सांगोला उपसासिंचन योजनेसाठी बैठक लावावी | पुढारी

माळशिरस-सांगोला उपसासिंचन योजनेसाठी बैठक लावावी

अकलूज : पुढारी वृत्तसेवा माळशिरस- सांगोला उपसा सिंचन योजनेसाठी मंत्रालयात बैठक लावावी, असे निवेदन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिले. आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण होऊन सुमारे 50 वर्षे पूर्ण झाले. परंतु माळशिरस तालुक्यातील उंच भागास अद्यापही पाण्याचा थेंब मिळाला नाही. तालुक्यातील नीरा उजवा कालव्याच्या वरील बाजूस असलेली गावे पिढ्यान्पिढ्या दुष्काळ सोसत आहेत.
माळशिरस व सांगोला तालुक्यासाठी सांगोला- माळशिरस उपसा सिंचन योजना मंजूर करणेबाबत सन 1994 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मागणी केली.

परंतु, भीमा प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित मान्यता (2004) मध्ये त्याचा अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर सांगोला उपसा सिंचन योजना 2 टी. एम. सी. योजनेस मंजुरी देण्यात आली. भीमा नदीवरील जांबूड को. प. बंधारा येथून पाणी उचलून माळशिरस तालुक्यासाठी 2 टी. एम. सी. पाणी नीरा उजवा कालवा मैल क्रं. 77 मध्ये टाकून कमी पडणार्‍या पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी उपसा सिंचन योजनेचा अभ्यास करून सन 2006 साली त्याला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

जांबूड येथील को. प. बंधारा येथून पाणी उचलून मैल क्रं. 77 मध्ये टाकल्यास माळशिरस तालुक्यातील वंचित भागास व सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेल्या उपसा सिंचन योजनेस शाश्वत पाणी मिळू शकते. उजनी धरणाच्या नव्याने पाणी उपलब्धतेचा अभ्यास झाला असून त्यामध्ये पाणी उपलब्ध आहे. या उपलब्ध पाण्यातून सोलापूर जिल्ह्यातील एकमेव माळशिरस तालुक्यासाठी उपसा सिंचन योजना नसून माळशिरस मधील वंचित राहणार्‍या भागासाठी 2 टी.एम.सी. उपसा सिंचन योजना मंजूर करणेत यावी. यामुळे सांगोला व माळशिरस तालुक्यातील सलग पाण्यापासून वंचित राहणार्‍या भागात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुमारे 20 ते 25 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. सांगोला उपसासिंचन योजना स्वतंत्र करण्याऐवजी माळशिरस- सांगोला अशी उपसासिंचन योजना एकत्र केल्यास खर्चात बचत होईल व भविष्यकाळात देखभाल दुरुस्ती व इतर खर्चातही बचत होणार आहे. यासाठी माळशिरस- सांगोला उपसासिंचन योजना करणेबाबत बैठक आयोजित करणेत यावी, अशी विनंती ही या निवेदनात केली आहे.

Back to top button