ज्ञानातून कामाची निर्मिती व्हावी : गिरीश प्रभुणे | पुढारी

ज्ञानातून कामाची निर्मिती व्हावी : गिरीश प्रभुणे

बार्शी : पुढारी वृत्तसेवा ज्ञान असे पाहिजे की त्या ज्ञानातून हाताला काम मिळाले पाहिजे, असे मत पद्मश्री पुरस्कारप्राप्त गिरिश प्रभुणे यांनी व्यक्त केले. भारत विकास परिषद शाखा बार्शी यांच्या वतीने माजी प्रांताध्यक्ष व माजी प्रांतसचिव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रभुणे बोलत होते. सूर्यासारखा तेजस्वी समाज निर्माण करायचा असेल तर चाकोरीबाहेर जाऊन शिक्षण द्यावे लागेल व हे काम शिक्षकच उत्तमपणे करू शकतील. शिक्षकांवर समाज घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. असे प्रभूणे यांनी सांगितले. तत्पूर्वी भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन गिरीश प्रभुणे, दत्तात्रय चितळे, अतुल सोनिग्रा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक बार्शी शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी केले.

बार्शी शाखेने राबविलेल्या उल्लेखनीय उपक्रमांचा उल्लेख केला. कोरोना काळात केलेले धान्य वाटप, शिक्षक पुरस्कार, ऊसतोड महिला कामगारांना साडी वाटप, वारकर्‍यांना औषधोपचार असे उपक्रम राबविल्याचे सांगितले. गिरीश प्रभुणे, दत्तात्रय चितळे, अतुल सोनिग्रा, विनय खटावकर, अनिरुद्ध तोडकर, रमेश विश्‍वरुपे, प्रविणा ओसवाल, संजय कुलकर्णी यांचा बार्शी शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला बार्शी शाखेतील उल्लेखनीय कार्याबद्दल अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव सुहास देशमुख प्रकल्पप्रमुख वंदना कुलकर्णी, प्रमोदिनी कोठारी, कोषाध्यक्ष संतोष जोशी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळे यांनी केले. सुहास देशमुख यांनी आभार मानले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला बार्शी शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button