नीरा, कृष्णा नद्यांना महापूर, पण माणदेशात निम्मा पावसाळा उलटला तरी माणगंगा तहानलेलीच…! | पुढारी

नीरा, कृष्णा नद्यांना महापूर, पण माणदेशात निम्मा पावसाळा उलटला तरी माणगंगा तहानलेलीच...!

सांगोला : भारत कदम नीरा नदी परिसर व कृष्णा नदी परिसर आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने कहर माजवला आहे. येथील छोट्या-मोठ्या प्रत्येक नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. तसेच विदर्भ आणि खानदेशातील नद्यांना महापूर येत असताना पश्‍चिम महाराष्ट्रातील माणदेश परिसराची वरदायिनी असलेली माणगंगा अद्याप तहानलेलीच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संपूर्ण जून आणि जुलैचा महिनाही संपत आला तरीही, माण नदी अद्याप कोरडीच आहे, तर 18 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ठणठणीत कोरडे आहेत. नीरा व कृष्णा नद्यांना पूर येतो व येथील जीवित, आर्थिक, वित्त हानी होते. नीरा व कृष्णा नद्यांचे पुराने वाया जाणारे पाणी माण नदीत सोडावे, अशी मागणी तालुक्यातील जनतेमधून केली जात आहे.

सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतून जाणारी एक प्रमुख नदी म्हणून ओळख असलेल्या माण नदीकाठी वसलेल्या परिसराला माणदेश म्हणून ओळखले जाते. माणदेशातील नदीकाठचा बहुतांशी शेतकरी आपली शेती या नदीच्या पाण्यावरच कसतो. पावसाळ्यात कोकण आणि सांगली, कोल्हापूर भागांतील कृष्णा, पंचगंगासह अन्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्यास या नद्यांचे अतिरिक्त पाणी टेंभू योजनेद्वारे वळवून ते दरवर्षी माण नदीत सोडले जाते. या अतिरिक्त पाण्यातून माण नदीवर असलेले सर्व कोल्हापूर पद्धतीचे तसेच अन्य बंधारे भरुन घेतले जातात. पावसाळ्यात एकदा नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन घेतल्यास नदीकाठच्या सर्व शेतकर्‍यांना याचा वर्षभर फायदा होतो. यामुळे शेतीला मुबलक पाणी तर मिळतेच, शिवाय भूजल पातळीतही वाढ होत असल्याने बंधार्‍यातील पाणी संपुष्टात आल्यानंतर या शेतकर्‍यांना विहिरी, कूपनलिका सारख्या जलस्रोतांतून सहजपणे पाणी उपलब्ध होते.

एकंदरीतच कायम दुष्काळी असणार्‍या माण, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांसाठी माण नदी एक वरदान मानले जाते. नदीकाठी असलेला शेतकरी वर्षभर शेतीच्या पाण्यासाठी माण नदीवर अवलंबून असतो. सांगोला तालुक्यातून गेलेली सर्वात मोठी नदी म्हणून या नदीची ओळख आहे. शिवाय या नदीच्या दोन्ही बाजूंना असलेले सिंचनाखालील क्षेत्र प्रचंड असल्याने या पाण्यावरच तालुक्यातील बहुतांशी शेती व शेतकरी अवलंबून आहेत.

सांगोला तालुक्यातील खवासपूर. वझरे, चिणके, बलवडी, नाझरे, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, सांगोला, वाढेगाव, सावे, बामणी, देवळे व मेथवडे या गावांतून माण नदी प्रवास करत पुढे मंगळवेढा तालुक्यात प्रवेश करते. सांगोला तालुक्यातील सुमारे 15 ते 20 गावांतील निम्म्याहून अधिक क्षेत्र सिंचनासाठी माण नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या नदीला पाणी आल्यास किंवा या पाण्यातून नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन घेतल्यास सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होतो. मात्र जुलै महिना उलटत आला तरी माण नदीच अद्याप तहानलेली असल्याने नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या घशाला कोरड पडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कृष्णा नदीचे व नीरा नदीचे वाया जाणारे पाणी माण नदीत सोडावे, अशी मागणी दुष्काळी भागांतील जनतेमधून होत आहे.

वाया जाणार्‍या पाण्याने बंधारे भरले पाहिजेत

माण नदीवरील व सर्व सांगोला तालुक्यातील लोकांनी कायमस्वरुपी पाण्यासाठी मागणी केली पाहिजे. माण नदीला कॅनॉलचा दर्जा मिळाला पाहिजे. कृष्णा नदीचे पावसाळ्यात वाहून कर्नाटक, आंध्र प्रदेशात जाणारे ओव्हर फ्लो पाणी जुलैमध्ये टेंभू उपसा योजन मधून माण नदीमध्ये मेथवडेपर्यंत सोडले पाहिजे. सांगोला तालुक्यातील नीरा उजव्या कालव्याचे ओव्हरफ्लो वाहून जाणारे पाणी माण नदीला सोडून बंधारे भरुन घेतले पाहिजेत व सर्व सांगोला तालुक्यातील तलाव भरुन घेतले पाहिजेत. हे सर्व काम कागद रेकॉर्डवर झाले पाहिजे. राजकारण बदलत राहते, पाणी कायमस्वरुपी आले पाहिजे.

Back to top button