संत सावता माळी यांच्या भेटीला निघाले विठूराया | पुढारी

संत सावता माळी यांच्या भेटीला निघाले विठूराया

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा ‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी’, असे म्हणत पंढरपूरला कधीही न येता आपल्या कामातच विठ्ठलाला शोधणारे श्री संत सावता महाराज यांच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे व परंपरेप्रमाणे विठुरायाचा पादुका पालखी सोहळा जातो. यंदा या सोहळ्याने रविवार, 24 रोजी पंढरपूर येथून प्रस्थान केले असून दि. 26 रोजी अरण येथे दाखल होत आहे. हा पालखी सोहळा उत्साहात साजरा होत आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा झाल्यानंतर विठ्ठलाच्या पादुकांचा पालखी सोहळा सावता माळी यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी म्हणजेच अरण (ता.माढा) येथे जातो. असे म्हटले जाते की, सावता माळी हे कधीच श्री विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला आले नाहीत. म्हणून सावता माळी कोण आहेत, भेटीला का आले नाहीत, हे पाहण्यासाठी श्री विठ्ठल स्वत: सावता माळी यांच्या भेटीला जातात, अशी आख्यायिका सांगितली जाते.

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे विठूरायाचा पालखी सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा निर्बंधुमक्तपणे सोहळा साजरा करण्यात आल्याने भाविकांमध्ये उत्साह होता. लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते.
आषाढी यात्रा सोहळा झाल्यानंतर श्री विठ्ठलाचा पालखी सोहळा सावता माळी यांच्या भेटीला जातो. यंदा निर्बंधमुक्त सोहळा साजरा होत असल्याने या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत. पंढरपूर येथील रविवार, 24 जुलै रोजी काशीपाकडी समाज मठातून या पालखीचे प्रस्थान करण्यात आले. पंढरपूर ते रोपळे, आष्टी, मोडनिंब ते अरण असा पालखीचा प्रस्थानमार्ग असणार आहे. दि. 26 जुलै रोजी पालखी अरणमध्ये दाखल होत आहे. दि. 27 रोजी सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे. या दिवशी सावता महाराज व श्री विठ्ठल यांच्या पादुकांची अनोखी भेट होत आहे. दि. 28 रोजी आमावस्येला काला साजरा होऊन पालखी सोहळ्याची सांगता होते. दरम्यान, पंढरपूर ते अरण या पालखीमार्गाची दुरवस्था झालेली आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी वारकर्‍यांमधून केली जात आहे. विठूरायाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मंदिर समितीनेही प्रयत्न करावेत, अशी मागणी सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे.

श्री विठ्ठलाच्या पालखीने सावता माळी यांच्या भेटीसाठी रविवार, 24 रोजी प्रस्थान केले आहे. रोपळे, आष्टी, मोडनिंब असे करत दि. 26 रोजी अरण येथे पोहोचत आहे. 27 रोजी सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे. या दिवशी सावता महाराज व श्री विठ्ठलाच्या पादुकांचा अनोखा भेट सोहळा पार पडणार आहे, तर 28 रोजी काल्यानिमित्त श्रीफळ हांडी होणार आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.
– नागेश गंगेकर

पालखी सोहळाप्रमुख दोनशे वर्षांची परंपरा

श्री विठ्ठलाच्या पालखी सोहळ्याला दोनशे वर्षांची परंपरा आहे. आषाढी सोहळ्यासाठी पंढरपुरात सर्व संतांच्या पालख्या येतात. परंतु, श्री संत सावता माळी हे आपल्या शेतात कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी, असे म्हणत शेतातच कष्ट करत देवाची आराधना करायचे. यामुळे खुद्द विठ्ठलच आषाढी वारीनंतर सावता महाराजांच्या भेटीला जातात, अशी आख्यायिका सांगतिली जाते. काशीकापडी समाज हा पालखी सोहळा घेऊन जातो. या पालखी सोहळ्याला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे.

Back to top button