अक्कलकोटमध्ये 40 टक्के पेरण्या प्रलंबित | पुढारी

अक्कलकोटमध्ये 40 टक्के पेरण्या प्रलंबित

हंजगी : पुढारी वृत्तसेवा जून महिना उलटून जुलै महिना सुरू झाला आहे, मात्र अद्यापही अक्कलकोट तालुक्यात बर्‍याच भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. एकूण तालुक्यामध्ये केवळ 60 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. अद्याप 40 टक्के पेरण्या शिल्लक असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी दिली. पाऊस लांबल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित असून, खरिपाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून तालुक्यात पावसाचे प्रमाण असमान राहिल्याने काही मंडलांत अधिक पाऊस, काही मंडलांत कमी, तर काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. यामुळेच तालुक्यात पेरणीचे प्रमाणही असमान राहिले आहे. तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस तडवळ भागात झाल्याने या भागात खरीप पेरण्या मोठ्याप्रमाणात झाल्या आहेत. वागदरी भागात कमी पाऊस झाल्याने या भागातील बहुसंख्य खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचप्रमाणे दुधनी, मैंदर्गी, चपळगाव, सलगर, नागणसूर, हैद्रा, जेऊर भागातही कमी-अधिक प्रमाणात खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

एकंदरीत तालुक्यात आजपर्यंत 60 टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अजूनही तालुक्यात चाळीस टक्के पेरण्या प्रलंबित राहिल्याचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी सांगितले. तालुक्यात सर्वाधिक 19 हजार 164 हेक्टर क्षेत्रावर तूर, तर 17 हजार 824 हेक्टर क्षेत्रावर उडिदाची पेरणी झाली आहे. त्यानंतर सोयाबीन 4 हजार 646 हेक्टर, मूग 1 हजार 961, सूर्यफुलाची 299 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यानंतर तालुक्यात बाजरी, भुईमूग आदी खरीप पिकांच्या कमी-अधिक प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.
तालुक्यात यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सर्वदूर पाऊस न झाल्याने काही भागात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळेच या भागातील शेतकरी सध्या चिंतित झाल्याचे पाहायला मिळतात. काही भागांत वेळेवर आणि चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सध्या खरिपात आंतरमशागत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुक्यात एकीकडे सुकाळ तर एकीकडे अजूनही भीषणता पाहायला मिळत आहे.तालुक्यात यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून दमदार पाऊस न झाल्याने तलाव, ओढे कोरडे आहेत. सध्या तालुक्यात कृषी कार्यालयात पन्नास टक्क्यांवर कर्मचारी संख्या येऊन ठेपली आहे. सेवानिवृत्त व बदलीमुळे सध्या कर्मचारी संख्या कमी झाल्याने उपलब्ध कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढत असल्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. कर्मचारी संख्या कमी असूनही तालुक्यात ‘कृषी संजीवनी सप्ताह’ कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. खरीप पेरणीपूर्वी बांधावर जाऊन मार्गदर्शन केल्याचे तालुका कृषी अधिकारी माळी यांनी सांगितले.

पाऊस लांबल्यास बागायत पिकांना फटका

तालुक्यात पाऊस लांबल्याने ऊस, केळी, द्राक्ष, लिंबू आदी फळबाग पिकांना सध्या फटका बसत आहे. जुलै महिना सुरू झाला तरी अजूनही मोठा पाऊस न झाल्याने विहीर, बोअरवेलमधील पाणीसाठा कमी होऊन त्या कोरड्याठाक पडत आहेत. जुलै महिन्यात पावसात खंड पडला तर तालुक्यातील ऊस, द्राक्ष, केळी आदी बागायत पिके धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

यंदा तालुक्यात असमान पाऊस झाला आहे. काही भागांत पाऊस लांबल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. अजूनही वेळ गेली नाही. या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यास तालुक्यात शंभर टक्के खरीप पेरण्या पूर्ण होऊ शकतात.
– चिदानंद खोबन
कृषी सहायक, अक्कलकोट

Back to top button