ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक | पुढारी

ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा 10 जुलै रोजी आषाढी वारी व बकरी ईद हे दोन मोठे उत्सव एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे स्वयंघोषित प्राणीमित्र व गोरक्षकांनी जनावरांची वाहने अडविणे, त्यांची चौकशी करणे अशी कृत्ये करू नयेत, असे पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले. तीन दिवसांनी साजरी होणार्‍या बकरी ईदच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यावेळी उपस्थित होते.
शहरातील प्रवेशमार्गावर एकूण आठठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे.

गोहत्या करणे, गोमांसाची वाहतूक करणे हे कायद्याने प्रतिबंध आहे. प्राण्यांशी निर्दयतेने वागू नये, कायद्याचे पालन करावे, सोशल मीडियाचा गैरप्रकार टाळावा, चुकीचे संदेश, मेसेज, काही पोस्ट फॉरवर्ड न करता तत्काळ डिलीट करुन टाकाव्यात, धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेजेस, पोस्ट याबाबत प्रतिक्रिया न देता त्याबाबत सजग राहून त्याची माहिती तत्काळ द्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. कडूकर यांनी केले.

पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. आघाढी वारी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी येणे ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक सण एकत्र आले आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर शासन केले जाईल. इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार उघडकीस आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

Back to top button