माळढोक पक्षाचे वन्यजीव गणनेत दर्शनच नाही! | पुढारी

माळढोक पक्षाचे वन्यजीव गणनेत दर्शनच नाही!

उत्तर सोलापूर ; पिंटू विभुते : नान्‍नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक पक्षी अभयारण्यातील पक्षी व वन्यप्राण्याच्या गणनेत बहुचर्चित माळढोक पक्षाचे दर्शनच झाले नाही…! काळवीट, रानडुक्‍कर, लांडगा यांची संख्या वाढली. तर मोर, खोकड, ससा यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले.

अभयारण्यात सोमवारी (दि. 16) बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीपासून 17 मे पर्यंतच्या कालावधीत वन्य प्राण्यांची गणना वन अधिकारी कर्मचारी व पक्षी मित्र प्रेमीकडून करण्यात आली. या गणनेसाठी अभयारण्यासह पाणवठ्याच्या परिसरात 7 ते 8 ठिकाण मचाण उभारण्यात आले होते. त्यामध्ये बसून चार ट्रॅक कॅमेर्‍यांसह दुर्बीणद्वारे वनकर्मचारी व पक्षीप्रेमींनी वन्यजीव गणना केली. अभयारण्य परीक्षेत्रात कृत्रिम व नैसर्गिक एकूण 18 पाणवठ्यावर वन्यजीव गणना पार पडली.

यापूर्वी सन 2019-20 साली वन्यजीव गणना झाली होती. यामध्ये एका पक्षाने दर्शन दिले होते. तर कोरोना महामारीमुळे दोन वर्ष अभयारण्य क्षेत्रातील वन्यजीव गणना झाली नव्हती. तत्त्पूर्वी झालेल्या गणनेच्या तुलनेत यावर्षी काळवीट रान डुक्कर, लांडगा, मुंगूस, रानमांजर वन्य प्राण्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मोर, खोकड, ससा, घोरपड या प्राण्यांची संख्या घटल्याची निदर्शनास येत आहे.

यावर्षीच्या वन्यजीव गणनेत गंगेवाडी हद्दीत प्रथमच चार निलगाईनी दर्शन दिले. अनेक प्राणी व पक्षांचे शांत वातावरणात पाणवठ्यावर पाणी पितानाचे दृश्य पक्षीप्रेमींनी कॅमेर्‍यात टिपले.

या वन्यप्राणी गणनेत नान्नज माळढोक पक्षी वनाधिकारी शुभांगी जावळे, वनपाल गुरुदत्त दाभाडे, ए. ए. मुंडे, वनरक्षक अशोक फरतडे, ललिता बडे, वाघचौरे, भागवत मस्के, चंद्रकांत व्होनमोरे, सारंग म्हमाणे, एस. ए. साठे, रेणूका सोनटक्के, सुधीर गवळी इतर वनकर्मचारी, वन्यप्रेमी पक्षी मित्र सहभागी झाले होते.

Back to top button