पंढरपूर : कार व एस.टी. बसची समोरासमोर धडक, 1 ठार | पुढारी

पंढरपूर : कार व एस.टी. बसची समोरासमोर धडक, 1 ठार

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथून देवदर्शन करून गावी परतत असताना कार व एस.टी. बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील एक ठार, तर पाचजण गंभीर जखमी तर एस. टी. मधील दोन प्रवासी असे या अपघातात एकूण आठजण जखमी झाले.

ही घटना पंढरपूर-मोहोळ रोडवरील देगाव गावाजवळ नाईकनवरे मळा येथे रविवारी सकाळी 11.30 च्या दरम्यान घडली. मयत व जखमी हे लातूर जिल्ह्यातील आहेत. दत्तात्रय रामराव भोसले (वय 45) हे ठार झाले आहेत.

याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूरहून लातूरकडे रविवारी सकाळी कारमधून (एमएच 11 बीव्ही1942) सहाजण चालले होते. दरम्यान सकाळी 11.30 वा. पंढरपूर तालुक्यातील देगाव गावानजीक नाईकनवरे मळा येथे कार आली असता समोरुन येणार्‍या उस्मानाबाद-कोल्हापूर या एस.टी. बसची समोरासमोर धडक झाली.

या अपघातामध्ये कारगाडीमधील 6 जण जखमी झाले, तर गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दत्तात्रय रामराव भोसले हे मृत्यू पावले आहेत. व्यंकट मारुती भोसले, शरद वसंत भोसले, सुनील किसन भोसले, सचिन किसन कदम, कार चालक शंकर माधव मोटे, शिवाजी प्रल्हाद भोसले (सर्व रा. गोंदरी, ता. औसा जि. लातूर) हे जखमी झाले.

एस.टी. बसमधील काशिनाथ महादेव स्वामी (रा. चाअराखळी ता. कळंब) व अमृता अनिल भुरटे (रा. हमीदवाडा, ता. कागल) हे जखमी झाले आहेत.सर्व जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीने पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोविस स्टेशनचे पोलिस अधिकारी अशोक जाधव, नितीन चवरे, सुजित उबाळे हे तातडीने घटनास्थळी पोचले व जखमींना रुग्णालयात दाखल करुन वाहतूक सुरळीत केली.

याबाबत बसचालक योगेश ज्ञानदेव मेंडके(वय 27, रा. बामणी ता. जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोहे.कॉ. उबाळे करत आहेत.

Back to top button