सोलापूर 'उत्पादन शुल्क'ची मोठी कारवाई; ६७ लाखांची विदेशी दारू जप्त | पुढारी

सोलापूर 'उत्पादन शुल्क'ची मोठी कारवाई; ६७ लाखांची विदेशी दारू जप्त

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : जत – सांगोला महामार्गावरील सोनंद गावाच्या हद्दीत एका कंटेनरवर छापा टाकून गोवा बनावटीच्या विदेशी दारुच्या ८९० पेट्या जप्त केल्या. याप्रकरणी चालक ज्ञानेश्वर अशोक भोसले (वय ३९, रा. पांखरापूर ता. मोहोळ) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ तुकाराम भोसले, बाळू भोसले, शेखर भोसले व कंटेनर मालकासह इतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. एकूण ७५ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज (शुक्रवार) पहाटे सोलापूर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके नेमण्यात आली होती. या पथकाकडून कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवर कडक गस्त घालण्यात येत होती. यावेळी एका सहाचाकी कंटेनरवर (क्र.०४-जीआर-७२३७) छापा टाकून गोवा बनावटीच्या विदेशी दारुच्या एकूण ८९० पेट्यासह ६६ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला. तसेच २ जुने मोबाईल व कंटेनर असा एकूण ७६ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई सोलापूर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरिक्षक भरारी पथक सुरेश झगडे, दुय्यम निरिक्षक व २ अंकुश आवताडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. आर. होळकर, चेतन कहनगुटी, डी. एम. वाघमारे, पी. बी. कुटे यांच्या पथकाने केली.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

Back to top button