‘फ्लेमिंगो’ पक्ष्यांनी फुलला एकरूख, हिप्परगा तलाव | पुढारी

‘फ्लेमिंगो’ पक्ष्यांनी फुलला एकरूख, हिप्परगा तलाव

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील हिप्परगा आणि एकरुख तलावात सायबेरियातून फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवेच्या थवे आले आहेत. सायबेरियातून अन्‍नाच्या शोधार्थ ते दरवर्षी येथे येतात. सध्या तलावाच्या पाण्यावर ते तरंगताना जणू परिसर फ्लेमिंगोनेच फुलल्याने सौंदर्यात भर पडली आहे. या मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

साधारण हिवाळ्यातील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे भारतातील विविध ठिकाणी मार्गक्रमण करतात. अग्निपंख आणि रोहीत या नावाने हे पक्षी भारतात ओळखले जातात.

सध्या सोलापुरात एकरुख आणि हिप्परगा तलाव परिसरात 30 ते 40 पक्ष्यांचा कळप दिसून येत आहे.भिगवण परिसरात 2-3 हजारांच्या संख्येने तर नवी मुंबई, मध्य मुंबईतील खाडी परिसरात 20 हजारांच्या संख्येने हे पक्षी दिसून येतात. वास्तव्यास असताना एखाद्या मादीने अंडी दिल्यास काही पक्षी अंड्याच्या देखभालीसाठी मागे राहतात.

‘फ्लेमिंगो’ बाबत पक्षीनिरीक्षक डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सांगितले की, सोलापुरात आढळून येणारे फ्लेमिंगो हे सैबेरिया येथून आलेले असून सध्या तेथे कडाक्याची थंडी असून सर्वत्र बर्फ पडलेला आहे. त्यामुळे या फ्लेमिंगो पक्ष्यांनी अन्नाच्या शोधासाठी स्थलांतर केले आहे. जोपर्यंत सोलापुर परिसरामध्ये कडक ऊन पडणार नाही, तोपर्यंत हे पक्षी सोलापूर परिसरातच वास्तव्यास राहतील. सोलापूर व आजूबाजूच्या परिसरात सध्या फ्लेमिंगो, शिकारी पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळून येत आहेत. त्यामध्ये हॅरीअरच्या तीन प्रजाती, फालकन्सच्या तीन प्रजाती, डोमीसाईल क्रेन्स, बदकांच्या अनेक प्रजाती दिसून येत आहेत. संभाजी तलावा मध्येही अनेक पक्षी आढळून येत आहेत.

हिप्परगा, एकरुख परिसरात दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षी पहाण्यासाठी नेचर कॉन्जरवेशन सर्कलच्यावतीने पक्षी मित्र, पक्षी प्रेमिंच्या सहली आयोजीत करण्यात येतात. पक्षी निरीक्षण अचूकपणे होण्यासाठी त्याठिकाणी प्रशासनाने योग्य ती सोय करावी, अशी मागणी नेचर कॉन्जरवेशन सर्कलचे पक्षी तज्ज्ञ भरत छेडा यांनी केली आहे.

फेब्रुवारीत आगमन; मार्चला रवाना

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण, हिप्परगा सह रामपूर, एकरुख तलाव परिसरातही प्रत्येक वर्षी फ्लेमिंगोपक्ष्यांचे थवे फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत वास्तव्यास असतात. याठिकाणी आढळणारे पक्षी ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ प्रजातीचे असून कच्छ परिसरातील खाडीमध्ये त्यांचे प्रजनन होते. जुलैनंतर या पक्षांचे दक्षिणेकडे स्थलांतर होते. हिवाळ्याचा संपूर्ण काळ दक्षिणेकडे घालविल्यानंतर मार्चच्या दरम्यान हे पक्षी प्रजनन क्षेत्राकडे परत जातात. मार्चपासून जुलै पर्यंत या पक्ष्यांचा प्रजनन काळ आहे.

Back to top button