सोलापूर : पोलीस निरीक्षकाविरुध्द दुसर्‍यांदा विनयभंगाचा गुन्हा दाखल - पुढारी

सोलापूर : पोलीस निरीक्षकाविरुध्द दुसर्‍यांदा विनयभंगाचा गुन्हा दाखल

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाने त्याच्या घरामध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील जुना गुन्हा मिटवून घेण्यासाठी ‘त्या’ महिलेला घरी बोलावून जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवान माने (नेमणूक महिला प्रशिक्षण, केगाव, सध्या रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पीडित महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक माने याच्या विरोधात पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन येथे दि. 23/09/2020 रोजी गु.र.नं. 1025 /2020 भा.द.वि.376 (2) (छ), 354 (उ),328, 417,504, 506,507 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

दरम्यान, पीडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत, दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रकांत भगवान माने याने  त्याच्या मधूवन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर येथील घरी बोलावून घेतले. घरी पीडित महिला आल्यानंतर तिला तू पुण्यात दाखल असलेला गुन्हा मिटवून घे, आपण पहिल्यासारखेच राहू असे म्हणू लागला. त्यावेळी पीडित महिलेने पोलिस निरिक्षक माने यांना कोर्टातून जो निकाल लागेल तो लागेल असे म्हणाली.

त्यावेळी पोलिस निरीक्षक माने यांनी पीडित महिलेला तु माझ्यावरील केस मागे घे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून तिला धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी पीडित महिलेने आपले प्रकरण न्यायालयात चालू आहे, तू मला लग्नाचे अमिष दाखवून फसवलं आहेस, मी केस मागे घेणार नाही असे सांगितले.

त्यावेळी पोलिस निरीक्षक माने यांनी दरवाजा आडवा करून माझ्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फिर्यादीने मोबाईल त्याला दिला नाही. त्यानंतर पोलिस निरीक्षक माने यांनी तिचा हात पकडून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्यानंतर चंद्रकांत माने याने परत तू माझ्यावरील केस मागे घे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून मला धमकी दिली. अशी नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगीराज गायकवाड हे करत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button