धावपटू बंडू वाघमोडे वर करमाळ्यात अंत्यसंस्कार | पुढारी

धावपटू बंडू वाघमोडे वर करमाळ्यात अंत्यसंस्कार

करमाळा ; तालुका प्रतिनिधी : करमाळ्यातील धावपटू बंडू दत्तात्रय वाघमोडे (वय 21, रा. सुपनवर वस्ती, खांबेवाडी) याचा हरियाणात आंतरराज्य स्पर्धेत धावताना मृत्यू झाला. गेल्या 19 सप्टेंबर रोजी महक (जि. रोहतक) येथे पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला. त्याने हे अंतर पार करून स्पर्धा जिंकलीही होती. मात्र, त्यानंतर धावपट्टीवरच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्याचा मृतदेह बुधवारी रात्री करमाळ्यात आणण्यात आला. रात्री उशिरा धावपटू बंडू वाघमोडे अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, मृत धावपटू बंडू वाघमोडे हा करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. बंडूचे वडील दत्तात्रय वाघमोडे हे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. बंडू हा पैलवान व धावपटूसुद्धा आहे. बंडू याला पोलिस खात्यात नौकरी करण्याची इच्छा होती. तो पोलिस भरतीची सुद्धा तयारी करीत होता.

गेल्या दोन महिन्यांपासून तो श्री कमलादेवी स्पोर्टस् क्लबमध्ये रूजू झाला होता. त्याला जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून हरियाणा येथे स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवण्यात आले होते.

तम्यानुसार तो 16 ऑक्टोबररोजी करमाळा येथून करमाळ्यातील दहा स्पर्धकांसमवेत महक येथे गेला होता. तो 19 रोजी पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. हे अंतर पार करून त्याने ही स्पर्धा जिकंली होती. मात्र वेगवान धाव घेतल्याने त्याला धावपट्टीवरच हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान बंडू याच्या निधनानंतर प्रशिक्षक दिनेश जाधव बंधू नामदेव वाघमोडे व अशोक वाघमोडे हेही हरियाना येथे गेले होते. तेथून बुधवारी रात्री मृतदेह घेऊन ते सर्वजण करमाळा येथे पोहोचले. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसंगी सर्वस्तरातील नागरिक उपस्थित होते मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. बंडू वाघमोडे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन विवाहित बहिण असा परिवार आहे.

Back to top button