सोलापूर : भाजप स्वबळावर, महाआघाडीचे ‘वेट अँड वॉच’ | पुढारी

सोलापूर : भाजप स्वबळावर, महाआघाडीचे ‘वेट अँड वॉच’

सोलापूर ः महेश पांढरे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध जात प्रवर्गासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे, तर प्रशासनाकडून मतदार याद्यांचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनासह विविध राजकीय पक्षही निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. स्वबळाचा नारा देत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप लढवणार असल्याची माहिती शहर व जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली आहे, तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची हे वरिष्ठांच्या आदेशानंतरच स्पष्ट होईल, असे सांगितलेे आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 77 जागांसाठी, तर पंचायत समितीच्या 154 जागांसाठीची आरक्षण सोडत पार पडली आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झाले आहेत. आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले आहे. तरीही भारतीय जनता पार्टीने या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यासाठी प्राथमिक तयारी म्हणून प्रत्येक बुथ सक्षमीकरण करण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसांतच प्रदेश कार्यालयातून अनेक नेते सोलापूर जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत.त्या दौर्‍यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणनीती ठरणार असल्याची माहिती शहर व जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात भाजपचे 8 आमदार, तर 2 खासदार आहेत.त्यामुळे भाजपचे जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व असताना कोणत्या पक्षासोबत युती आणि आघाडी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केलेे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 77 जागा आणि पंचायत समितीच्या 154 जागांवर भाजपचे उमेदवार उभे करण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे, सध्या शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अनेक ठिकाणी मोठे धक्के बसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीला स्वबळावर समोरे जाणे शिवसेेनेला परवडणारे नाही. त्यामुळे जिल्हा शिवसेनेने निवडणुकीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. युती अथवा आघाडी करण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतरच निर्णय होईल, असे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, निवडणुकीच्यादृष्टीने बैठका सुरु झाल्या आहेत तसेच सक्षम उमेदवारांचा शोधही सुरू असल्याची माहिती शिवसेनेच्यावतीने देण्यात आली आहे.

या सर्व निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसची मात्र पुरीे पिछेहाट होत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील सध्या सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत काँग्रेस वेगळा चमत्कार करेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांची जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांतील आमदार खासदारांची घनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळे ते स्वतंत्र भूमिका घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार यावर अनेकांनी मौन बाळगले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जात असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच गटांत विविध जाती प्रवर्गाच्या महिलांचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे दक्षिणच्या नेत्यांचाही आत्मविश्वास खचला आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर बर्‍यापैकी वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीने येणार्‍या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून जिल्ह्यात विविध जिल्हा परिषद गटांत आणि पंचायत समिती गणांत इच्छुक उमेदवारांची संख्याही अधिक आहे, मात्र अनेक तालुक्यांत राष्ट्रवादीला स्वबळावर लढणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित यश हवे असेल तर महाविकास आघाडीतील काही मित्रपक्षांची साथ घ्यावी लागणार आहे.त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी सकारात्मक असल्याचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी सांगितलेे.

आमची स्वबळाची तयारी ः विक्रम देशमुख

भारतीय जनता पार्टीने येणार्‍या निवडणुकीच्या अनुषंगाने बुथ सक्षमीकरणावर भर दिला आहे. तसेच येत्या काही दिवसांत प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांचे दौरे होणार आहेत. यावेळी निवडणुकीची व्यूवहरचना ठरणार असल्याची माहिती भाजपचे शहर व जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.

जिल्हा कार्यकारिणीची लवकरच बैठक ः हसापुरे

पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरच या निवडणुकीबाबत जिल्ह्याची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी दिली आहे.

निवडणुकीची तयारी सुरू ः गणेश वानकर

कोणत्या पक्षाबरोबर युती अथवा आघाडी करायची याबाबत वरिष्ठ पातळीवरून अद्याप स्पष्ट संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने आता बैठका सुरू करण्यात आल्या आहेत तसेच सक्षम उमेदवारांचा शोधही सुरू करण्यात आला असल्याचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितलेे.

युती अथवा आघाडीबाबत लवकरच निर्णय ः साठे

येणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सक्षम आहे. मात्र, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष सोबत घ्यायचे की स्वबळावर निवडणुका लढायच्या, याबाबत अद्याप प्रदेश कार्यालयातून स्पष्ट आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आदेश येताच कोणासोबत आघाडी अथवा कोणासोबत युती करायची याचा निर्णय होईल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितलेे.

Back to top button