सोलापूर मनपा अंतिम प्रभागरचना जाहीर | पुढारी

सोलापूर मनपा अंतिम प्रभागरचना जाहीर

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले. याअंतर्गत निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. एकूण 38 प्रभागांपैकी 7 प्रभागांमध्ये अंशत: बदल करण्यात आला. 1 ते 37 क्रमांकाच्या प्रभागात तीन तर उर्वरित 38 क्रमांकांच्या प्रभागात 2 सदस्य असतील. यामुळे मिशन महापालिकेसाठी सत्ताधारी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी की स्वतंत्र पक्ष ? याची व्यूहरचना पुढे जागावाटपावर ठरणार आहे.

राज्यात सत्तांतरानंतर जिल्ह्यात पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपला बळ मिळाले असले तरी महापालिकेचे सत्ताकेंद्र अबाधित ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातच जिल्ह्यात भाजपचा वारू रोखण्याचा मुहूर्त महापालिकेपासूनच करण्यासाठी राष्ट्रवादीने इनकमिंग सुरू ठेवता व्यूहरचना सुरू ठेवली आहे.

यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी हजेरी लावून मोर्चेबांधणी सुरू केली. काँग्रेस, शिवसेनेसह अन्य पक्षांनीही आपापल्यापरीने सत्तेचा दावा करीत हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातच भाजपविरोधात नुकत्याच राज्यात सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची घोषणा झाली आहे.

पुन्हा राष्ट्रवादी-भाजप एकत्र आल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तोफ डागली आहे. अशातच सोलापूर महापालिकेची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. याचा प्रारंभ प्रभागरचनेपासून सुरू झाला आहे.

यापूर्वी महानगरपालिकेने प्रारुप प्रभारचना 1 फेब्रुवारी रोजी जाहीर करुन सूचना व हरकती मागविल्या होत्या. याअंतर्गत 108 सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर राज्य निवडणूक आयोगाकडून नियुक्त समितीकडे सुनावणी घेण्यात आली. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचनेने सोपस्कार करुन अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता मनपाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली. यानंतर महापालिकेच्या आवारात सूचनाफलकावर या अधिसूचनेशी प्रत व सर्व प्रभागांचा एकत्रित नकाशा नागरिकांना पाहाण्यासाठी खुला करण्यात आला.

‘एससी’चे 16 तर ‘एसटी’चे 2 प्रभाग

अंतिम प्रभागरचनेनुसार अनुसूचित जातीचे (एससी) 16 तर अनुसूचित जमातीचे (एसटी) चे 2 सदस्यांचे आरक्षण राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्र. 8, 21, 1, 10, 26, 27, 33, 22, 24, 23, 28, 38, 36, 7, 9 व 5 हे प्रभाग आरक्षित राहणार आहे तर अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्र. 24 व 35 आरक्षित राहतील. याअंतर्गत महिला व पुरुषांच्या आरक्षणाची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे.

दरम्यान अंतिम प्रभागरचना पाहण्यासाठी मनपात नगरसेवक, इच्छुक तसेच कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचे दिसून आले. मनपाच्या वेबसाईटवर तसेच सोशल मिडियावरही रचना व्हायरल झाल्याने बहुतांश जणांनी बसल्याठिकाणी आपल्या मोबाईलमध्येच रचना पाहणे पसंत केले.

Back to top button