भारनियमनाचे संकट तूर्तास टळले | पुढारी

भारनियमनाचे संकट तूर्तास टळले

दक्षिण सोलापूर ; संजीव इंगळे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकडे (एनटीपीसी) एनर्जी लोड सेंटरकडून विजेची मागणी करण्यात आल्याने प्रकल्पातील दुसरे युनिट शनिवारी (ता. 16) कार्यान्वित करण्यात आले. पूर्वी हे युनिट मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्यात आले होते. औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील सध्या 660 मेगावॅटचे दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करीत असून 1320 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रावरील भारनियमनाचे संकट तूर्तास टळले. ही मागणी जून महिन्यापर्यंतची असल्याने किमान जूनपर्यंत तरी राज्याला आता वीज कमी पडणार नाही.

सध्या एकूण वीजनिर्मितीच्या जवळपास 80 ते 85 टक्के वीज ही महाराष्ट्राला देण्यात येत आहे. सोलापूर एनटीपीसीतून सध्या पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत असल्याने तूर्तास तरी राज्याला आता तुटवडा भासणार नाही.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोळशाचा तुटवडा भासत असल्याने राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवणार असल्याचे औरंगाबाद येथे सांगितले होते. विजेचा वापर वाढल्याने मागणीदेखील वाढली, मात्र वीजनिर्मितीसाठी कोळशाचा तुटवडा भासत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे राज्याला भारनिमयनाच्या संकटाला सामोरे जावे लागणार होते.

मात्र, यावेळी सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील एकाच युनिटमधून ऊर्जानिर्मिती केली जात होती, तर दुसरे युनिट मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्यात आले होते. दुसर्‍या युनिटची मेंटेनन्सची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आणि एनर्जी लोड सेंटरकडून मागणी आल्याने त्वरित दुसर्‍या युनिटमधून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पात कोळशाचा तुटवडादेखील नाही.

मागणी आल्यास पूणर्र् क्षमतेने ऊर्जानिर्मितीसाठी दोन्ही युनिट सज्ज असल्याचे सोलापूर एनटीपीसी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही युनिटमधून 1320 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू असून यापैकी जवळपास एक हजार मेगावॅट वीज ही महाराष्ट्रास देण्यात येत आहे. सोलापूरच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी कोळशाचा तुटवडा नाही. इंधन पुरवठा करणार्‍या दोन कंपन्यांशी एनटीपीसीने महानंदी कोल फिल्डस् आणि सिंग्रेनी कोलिरीज कंपनीशी फ्युएल सप्लाय अ‍ॅग्रीमेंट केले आहे. शिवाय

उर्जानिर्मितीसाठी 20 टक्के इंम्पोर्टेड कोळसादेखील मुबलक उपलब्ध आहे. दररोज 18 हजार मेट्रिक टन कोळसा दोन्ही युनिटसाठी वीजनिर्मितीला वापरला जातो. डोमेस्टिक आणि इम्पोर्टेड कोळशाचा मेळ घालून सध्या वीजनिर्मिती करण्यात येत आहे. राज्याला तुटवडा भासणार्‍या विजेची मागणी विविध कंपन्यांकडून पूर्ण करण्यात येत आहे. सध्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकडे पाच हजार 732 मेगावॅट वीज निर्मितीचा करार असून 4400 मेगावॅट ऊर्जाही औष्णिक प्रकल्पाकडून पुरविण्यात येत आहे.

Back to top button