बार्शी ‘फटे स्कॅम’ प्रकरण : विशाल फटे ग्रामीण पोलिसांसमोर शरण | पुढारी

बार्शी ‘फटे स्कॅम’ प्रकरण : विशाल फटे ग्रामीण पोलिसांसमोर शरण

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणारा मुख्य आरोपी बार्शीचा विशाल अंबादास फटे हा सोमवारी सायंकाळी सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला.

तत्पूर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून खुलासा करीत शरण येणार असल्याची स्टंटबाजी केली होती. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून या प्रकरणाची व्याप्ती आणि अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

बहुचर्चित बार्शीचा बिग बुल बनलेल्या विशाल फटे याने शेअर मार्केट कंपनी काढून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले होते. अधिक व्याजाच्या हव्यासाने हळूहळू वाढत गेलेले त्याचे जाळे महाराष्ट्र, कर्नाटकात पसरले होते. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांसह अनेकांचा समावेश होता. तो गेल्या दोन आठवड्यापासून फरार झाल्याची चर्चा होती.

परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी बार्शी शहर पोलिस ठाण्यांमध्ये विशाल फटे व इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार चौकशीत दिवसेंदिवस व्याप्ती वाढत निघाली होती. दरम्यान, विशाल फाटे फसवणूक प्रकरणांमध्ये आतापर्यंत सुमारे 80 लोकांनी तक्रारी केल्या असून फसवणूक केलेली रक्कम ही सुमारे 21 कोटी रुपयांपर्यंत गेलेले आहे.

चौकशीनुसार नऊ जानेवारी पासून विशाल फटे हा त्याची पत्नी व मुलीला घेऊन बार्शी इथून गायब झाल्याचे समोर आले आहे. त्याचे कार्यालयही बंद असल्यामुळे त्याच्याकडे गुंतवणूक केलेल्या लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे बार्शी शहर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यामध्ये सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशाल फटे यांचे वडील अंबादास फटे व भाऊ वैभव फटे यास अटक करून पोलिस कोठडी घेतली आहे. विशाल फाटे याच्याकडून फसवणूक झालेल्या लोकांची संख्या ही खूप जास्त असल्यामुळे फसवणूक ईतील रक्कम ही कोट्यावधी रुपयांच्या घरामध्ये गेली आहे.

त्यासाठी विशाल फटे यांच्याकडून फसवणूक झालेल्या गुन्ह्याची व्याप्ती पाहता सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने या गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक संजयकुमार बोठे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र तपास पथक नेमण्यात आलेले आहे. या तपास पथकामार्फत या गुन्ह्याचा तपास सुरू असून दररोज फटे ने फसवणूक केलेल्या लोकांची संख्याही वाढतच असून गुन्ह्यातील रक्कम देखील वाढत आहे.

युटूबद्वारे खुलासा करत समोर

दरम्यान सोमवारी सकाळी फटे याने युट्यूबवर स्वतःचा एक व्हिडीओ काढून पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे सांगितले होते. या व्हिडिओची दिवसभर बार्शी शहर सोलापूर जिल्ह्यात एकच चर्चा होती. अखेर सोमवारी सायंकाळी मुख्य आरोपी विशाल फटे हा सोलापूरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतःहून हजर झाला.

यावेळी विशाल फटे यांच्या समवेत कोणीही नव्हते. तत्काळ ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. फटे यास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासमोर उभे करण्यात आले आहे. अधीक्षक सातपुते यांनी फटे याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.

फटे थेट अधीक्षक सातपुते यांच्या दारात..!

सोलापूरचे पोलिस अधीक्षक कार्यालय… सायंकाळी सव्वासहाची वेळ… पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क कक्षामध्ये पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना भेटण्यासाठी गर्दी होती. त्यावेळी भेटीसाठी आलेल्यांच्या नोंदी तेथील महिला पोलिस कर्मचारी घेत होत्या. त्यावेळी एका महिला पोलिस कर्मचार्‍यासमोर अचानक खांद्यावर काळी बॅग अडकवलेला एक व्यक्ती येतो. तो ‘मी विशाल फटे.’ मॅडम समोर हजर होण्यास आलो आहे असे म्हणतो.

हे शब्द ऐकताच पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क कक्षातील महिला कर्मचार्‍यांची भंबेरी उडाली. त्यांनी धावतपळत थेट अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांची केबिन गाठून त्यांना याबाबत माहिती दिली. वास्तविक फटे याने व्हिडीओच्या माध्यमातून जवळच्या पोलिस ठाण्यात हजर होण्याचे संकेत दिले होते; पण तो थेट मुख्यालयात येईल याचा अंदाज खुद्द श्रीमती सातपुते यांनाही नव्हता. तो अचानक तेथे आल्याने सातपुते यांच्यासह सर्वजण अवाक् झाले.

Back to top button