सोलापूर : मित्राच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा; पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केला होता खून | पुढारी

सोलापूर : मित्राच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा; पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केला होता खून

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशावरून मित्र ईरण्णा विरपक्ष बगले (वय 50, रा. केगाव खुर्द, ता. अक्‍कलकोट) याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी महादेव नागप्पा भैरामडगी (रा. केगाव खुर्द, ता. अक्‍कलकोट, ता. सोलापूर) याला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांनी हा निकाल दिला.

याबाबत माहिती अशी की, महादेव भैरामडगी व ईरण्णा बगले यांची मैत्री होती. दरम्यान, महादेव याचे त्याची पत्नी सविता हिच्याबरोबर वारंवार भांडण होत असे. यातून ती माहेरी निघून गेली होती. ते भांडण मिटविण्यासाठी 23 मार्च 2020 रोजी महादेव भैरामडगी हा ईरण्णा बगले यास मोटारसायकलवरून संजवाट (ता. दक्षिण सोलापूर) येथे सासरी घेऊन गेला होता.

तेथेच बोलता बोलता महादेव भैरामडगी याने ईरण्णा बगले याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने सपासप घाव घालून त्याचा खून केला. याप्रकरणी ईरण्णा यांचा मुलगा विरपक्ष बगले याने वडिलांच्या खुनाबद्दल मंद्रुप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून मंद्रुप महादेव भैरामडगी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी महादेव भैरामडगी यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी करता महादेवने पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे मी रागातून ईरण्णा याला मारून त्याचा खून केल्याचा जबाब दिला. त्यानुसार तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. याप्रकरणी न्यायाधीश श्रीमती पांढरे यांच्यासमोर सुनावणी झाली.

या खटल्यात सरकारच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश पांढरे यांनी आरोपी महादेव याला जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारच्यावतीने अ‍ॅड. माधुरी देशपांडे यांनी तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. बायस यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून सहायक फौजदार विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

सोलापूर मध्ये दोघा घरफोड्यांना अटक; १७ चोर्‍या उघडकीस

सोलापूर : शाळा बंद, ४० हजार शिक्षक शाळेत; ८ लाख विद्यार्थी घरात

सोलापुरात सापडला पहिला ओमायक्रॉन रुग्ण

पहा व्हिडीओ : राजर्षी छ. शाहू महाराज आणि एका शेणीवालीची गोष्ट | Stories of Ch.shahu Maharaj

Back to top button