देशभर सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे वारे वाहत आहेत. यावेळच्या प्रचाराची खासियत सर्वच राजकीय पक्षांनी सुरांची बरसात सुरू केली आहे. अपवाद केवळ डावे पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष. एकीकडे प्रचारसभा, तर दुसरीकडे सूरयात्रा असे त्याचे स्वरूप आहे. यात आघाडी घेतली आहे ती भारतीय जनता पक्षाने. 'मैं हूँ मोदी का परिवार' या गाण्याद्वारे भाजपने निवडणुकीच्या आधीच प्रचाराचा धुरळा उडवून दिला. पाठोपाठ 'सपने नहीं हकीकत बुनते है, तभी तो सब मोदी को चुनते है' या गाण्याने लोकप्रियतेचा कळस गाठला. यू ट्यूबवर सात कोटींहून अधिक लोकांनी या गाण्याला लाईक केले आहे. (Lok Sabha Elections 2024)
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यासाठी बारा भाषांतील एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. त्याचे बोल आहेत, 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते हैं।' मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत बजावलेल्या कामगिरीचा त्यात सूरमय आढावा घेण्यात आला आहे. एकूण 3 मिनिटे आणि 19 सेकंदांच्या या व्हिडीओत देशाने विकासाच्या दिशेने कशी कूस बदलली आहे, यावर सारा झोत केंद्रित करण्यात आला आहे. देशाच्या विविध भागांतील लोक बदललेल्या भारताचे गुणगान एका सुरात करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
भाजपने यू ट्यूबद्वारे प्रचाराचा सपाटा लावल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधी काँग्रेसने आपले म्हणणे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय गीत सादर केले आहे. हा व्हिडीओ 2 मिनिटे आणि 24 सेकंदांचा आहे. पाच आश्वासने आणि तरुणाईसाठी दोन गॅरंटी काँग्रेसने याद्वारे दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सर्वाधिक दृश्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. 'तीन रंग लहरायेंगे जब न्याय पायेंगे' असे यातील गाण्याचे बोल आहेत. तीन लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसनेही 'जोनोगोनेर गोर्जन' (जोरदार गर्जन) या गाण्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर टाकला आहे. त्यात भाजप बंगालविरोधी पक्ष असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये पश्चिम बंगालच्या विकासाचा ऊहापोह आहे. या पार्श्वभूमीवर, डावे पक्ष आणि आम आदमी पक्ष यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मौखिक आणि जाहीर प्रचारावर जोर दिल्याचे दिसून येते. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाकडे तूर्त पाठ फिरवली आहे.