नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी पाच न्याय आणि 25 गॅरंटी योजनांचा समावेश असलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केले. हा जाहीरनामा म्हणजे जनतेला समृद्धीकडे नेण्याचा संकल्प असून, काँग्रेस पक्ष पाच न्याय संकल्प घेऊन शेतकरी, तरुण, कष्टकरी, महिला व वंचितांत जाऊन जनतेच्या मुद्द्यांवर निवडणूक लढेल, असा दावा राहुल गांधींनी केला; तर भाजपची गत 2004 च्या इंडिया शायनिंग घोषणेप्रमाणेच होणार, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर यात चर्चा झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्यदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यम सरचिटणीस जयराम रमेश आणि संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी पत्रकार परिषदेत जाहीरनाम्याची माहिती दिली. काँग्रेस पक्षाचा केवळ निवडणुकीपुरता जाहीरनामाच नव्हे, तर उज्ज्वल भवितव्याची हमी देणारे न्यायपत्र असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. मागील 63 दिवसांपासून राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने पाच न्याय आणि 25 गॅरंटींबद्दल बोलत आहेत. त्याचा यात समावेश असल्याचे जयराम रमेश यांनी नमूद केले. बैठकीत पक्षाध्यक्ष खर्गे यांनी देशात बदलाचे वारे वाहत असल्याचे सांगताना, 2004 च्या इंडिया शायनिंग घोषणेप्रमाणे सध्याचे सरकार आश्वासनांची फुशारकी मारत असल्याचा टोला लगावला. 2004 च्या निवडणुकीत वाजपेयी सरकारचा पराभव झाला होता, आताही तसेच होणार असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधींनींही ट्विटद्वारे कार्याकरिणी बैठकीत जाहीरनाम्यावर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. हा जाहीरनामा व त्यातील गॅरंटी आश्वासने केवळ दस्तावेज नव्हे, तर कोट्यवधी देशवासीयांशी साधलेल्या संवादातून तयार केलेला आराखडा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.