‘हनीट्रॅप’ टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ठोकल्‍या बेड्या

‘हनीट्रॅप’ टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ठोकल्‍या बेड्या
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा :   तिचे शिक्षण केवळ नववी पास..सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत..पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात, पतीच्या मित्रासोबत ओळख झाली. तो देखील गुन्हेगार..त्यातूनच त्यांनी 'हनीट्रॅप' टोळी च्या माध्यमातून व्यवसायिक, तरुणांना जाळ्यात खेचण्यात सुरूवात केली.

अनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरून तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले. मात्र चार दिवसापूर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले.  अन् अवघ्या ७२ तासांच्या आत पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण हनीट्रॅप टोळी गजाआड केली.

हनीट्रॅपच्या टोळीला बेड्या

या टाेळीने पनवेल येथील व्यवसायिक नितीन दत्ता पवार (वय ३१) यांना मारहाण करत खंडणी उकळणार्‍या सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

रविंद्र भगवान बदर (वय 26,रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय 40,रा. गोकुळनगर कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय 32, रा.बाणेर मुळ सोलापूर माढा),मंथन शिवाजी पवार (वय 24,रा. इंदापूर) आणि (19 वर्षीय) तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

टोळीतील (19 वर्षीय) तरुणीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्यवसायिक नितीन पवार यांच्यासोबत ओळख निर्माण केली. त्यातूनच मैत्री करत त्यांना तरुणीने जाळ्यात खेचले. रविवारी तिने व्यवसायिकाला भेटण्यासाठी कोंढवा येथील येवलेवाडी परिसरात बोलाविले होते.

जबरदस्तीने शारीरिक संबंध

त्यावेळी आरोपी तरुणीने त्यांच्या अंगाशी झटून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर व्यवसायिक चारचाकी गाडीत बसून तरुणीसोबत निघाले होते.

दरम्यान अचानक तिघा अनोळखी व्यक्तींनी गाडी अड़वून गाडीत बसून त्यांना मारहाण केली. तसेच इन्स्टाग्रामवरील महिलेसोबत बलात्कार केला असल्याची पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली.

पैसे दिले नाही तर संबंधीत महिलेसोबत त्यांना लग्न करावे लागेल असे कागदावर लेखी घेतले. त्यावर व्यवसायिकाची सही व हाताचा अंगठा देखील घेतला. त्यानंतर व्यवसायिकाकडे ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली.

यावेळी व्यवसायिकाच्या खिशातील ५० हजारांची रोकड व त्यांच्या जवळील एटीएम कार्डद्वारे 30 हजार असे 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी व्यवसायिकाला सतत फोन करत होते. शेवटी त्यांनी कोंढवा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

चौकशीत  गुन्ह्याची दिली कबुली

तांत्रिक विश्लेषनाद्वारे पोलिसांनी माग काठून आरोपींना बोपदेव घाट गारवा हॉटेल येथून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक टोळीतील रविंद्र बदर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

तरुणीच्या पतीसोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच त्याने संबंधीत तरुणी व तिच्या भावाला एकत्र करून येवलेवाडी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथून तो ही हनीट्रॅप टोळी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हनीट्रॅप टोळीला गजाआड करण्‍याची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे कर्मचारी योगेश कुंभार, गणेश चिंचकर, महेश राठोड, अभिजित रत्नपारखी यांच्या पथकाने केली.

असा टाकायचे 'ट्रॅप'…

सुरुवातीला तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करायची, संबंधितांशी ओळख वाढली की पुण्यात भेटायच्या बहाण्याने बोलवायची. एकदा का सावज जाळ्यात अडकले की, भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर शरीर संबंध प्रस्थापित करत असे.

तेथून तरुण बाहेर पडला की टोळीतील सदस्य त्याला अडवत असत. टोळीत तरुणीचा भाऊ देखील होता. तरुणाला तु त्या मुलीवर बलात्कार केला आहेस, असे सांगून मारहाण करत. त्यानंतर त्यांच्याच टोळीतील काही व्यक्ती मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी करत. संबंंधित व्‍यक्‍ती पुढील कारवाई नकाे या भीतीपाेटी या टाेळीला पैसे देत असत.

पैसे मागण्यासाठी संपर्क केला अन् जाळ्यात अडकले…

हे सर्व प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादी पवार यांच्याकडे टोळीने 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली. यामध्ये या टोळीने पाच लाख घेण्याचे ठरविले होते. त्यातील ८० हजारांची रोकड देखील त्यांनी घेतली होती.

राहिलेल्या चार लाख ८० हजाराेसाठी आरोपी पवार यांना फोन करत होते. त्यांनी तक्रार दाखल करत याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आरोपींचा माग काढला.

त्यानंतर सर्वांना अटक केली. टोळीने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडील मोबाईलमध्ये त्यांनी अनेकांशी असा संवाद साधला आहे. त्यामुळे त्या मोबाईलची सायबर तज्ज्ञां‍कडून पडताळणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन…

संबंधीत टोळीने अनेकांना हनीट्रॅपच्या माध्यमातून लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र काही जण भीतीपोटी किंवा अब्रुला घाबरून पुढे येत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, किंवा कोणाकडून खंडणी उकळली गेली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news