सिंहायन आत्मचरित्र : आम्ही जनतेचे पुढारी, तुम्ही आमचे पुढारी!

11 ऑगस्ट 2014 रोजी नवी दिल्‍लीत पंतप्रधान निवासस्थानी माझ्या झालेल्या भेटीदरम्यान दै. ‘पुढारी’ पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. शेजारी चि. योगेश जाधव.
11 ऑगस्ट 2014 रोजी नवी दिल्‍लीत पंतप्रधान निवासस्थानी माझ्या झालेल्या भेटीदरम्यान दै. ‘पुढारी’ पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. शेजारी चि. योगेश जाधव.
Published on
Updated on

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

'डरते तो वो हैं, जो अपने छबि के लिए मरते हैं। और मैं तो हिंदुस्थान की छबि के लिए मरता हूँ। इसीलिए किसी से भी नहीं डरता हूँ।'
हे ऐतिहासिक उद‍्गार आहेत, भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. माणसाच्या विचारातून त्याचं व्यक्‍तिमत्त्व प्रतीत होतं असतं. मोदीजींच्या वरील विधानातून त्यांचं करारी व्यक्‍तिमत्त्व दिसून येतं. आणि मग गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान ही त्यांची गरुडझेप आपल्याला थक्‍क करून गेल्याशिवाय राहत नाही.

मुळात राजकारण काय, सत्ता काय किंवा घरपरिवार काय, कधी कधी हे सगळं सुरळीत चाललेलं असतानाच, हळूहळू एक प्रकारची अनामिक मरगळ जाणवू लागते. एक प्रकारची उदासीनता झाकोळून राहते. अशा वेळी आता भाकरी फिरवणं आवश्यक आहे; अन्यथा ती करपून जाईल, याची जाणीव नियतीला होऊ लागते. मग नियती ती भाकरी फिरवू शकेल, अशा समर्थ व्यक्‍तीचा शोध घेऊ लागते.

23 एप्रिल 2003 रोजी कोल्हापूरमध्ये झालेल्या भेटीत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे व नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनौपचारिक गप्पा मारताना मी.
23 एप्रिल 2003 रोजी कोल्हापूरमध्ये झालेल्या भेटीत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे व नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनौपचारिक गप्पा मारताना मी.

खरं तर, हा कुणी कुणाविरुद्ध पुकारलेला लढा नसतोच किंवा विद्यमान शासनकर्ता हा नाकर्ता झालेला आहे, असाही त्याचा अर्थ नसतो. माणसाच्या आयुष्याला आलेली मरगळच त्याला प्रस्थापितांविरुद्ध बंड करायला भाग पाडते. सर्वसामान्य जनता अशा वेळी मतदानाच्या पेटीतून भाकरी फिरवत असते, असं म्हटलं तर ते मुळीच चुकीचं होणार नाही. परंतु, त्यासाठी ती भाकरी फिरवणारा सक्षम नेता डोळ्यापुढे असणं तेवढंच महत्त्वाचं असतं.

जेव्हा एखादी व्यक्‍ती सर्वसंग परित्याग करून, आपल्याच घरावर तुळशीपत्र ठेवून, अन्यायाविरुद्ध लढायला ताठ मानेनं उभी राहते, तेव्हा नियतीसुद्धा 'तथास्तु' म्हणत असते! 2014 मध्ये असंच एक नेतृत्व भारतीय राजकारणाच्या पटलावर उदयाला आलं आणि त्यानं भाकरी फिरवली. त्याबरोबर एक नवा इतिहास जन्माला आला. कुणाला पटो वा न पटो; पण इतिहास हा इतिहासच असतो आणि जेव्हा तो घडतो, तेव्हा तो बदलता येत नाही. नेमकं हे असंच नरेंद्र मोदींच्या बाबतीत म्हणता येईल.

नरेंद्र मोदी! भारतीय राजकारणातील एक कमालीचं झंझावाती व्यक्‍तिमत्त्व! तसंच जगातील मोजक्याच प्रभावशाली नेत्यांमध्ये अग्रस्थान पटकावलेला एक महनीय नेता. नरेंद्र मोदी यांचा करिष्माच विलक्षण. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी भारतीय राजकारणाचे संदर्भच पार बदलून टाकले. अनेक धाडसी आणि आक्रमक निर्णय घेत, त्यांनी भारताला एक महाशक्‍ती बनवण्याचा जणू विडाच उचलला. अशा प्रभावशाली नेतृत्वाशी माझे ऋणानुबंध निर्माण झाले, हे मी माझं भाग्यच समजतो.

अशा या महान नेत्याची नि माझी पहिली भेट झाली, ती कोल्हापुरातच. 23 एप्रिल 2003 रोजी कोल्हापुरातील भाजपचे एक कार्यकर्ते बाबा देसाई यांच्या मुलाच्या लग्‍नकार्यासाठी ते आणि गोपीनाथ मुंडे कोल्हापूरला आले होते. त्या लग्‍नसमारंभाला मीही गेलो होतो. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी माझी नि मोदीजींची ओळख करून दिली होती. मोदीजी हे खूप गप्पीष्ट असून, त्यांना माणसं जोडणं आवडतं, हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. त्यांच्या त्या स्वभावामुळे त्याच भेटीत आमच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर काही ना काही कारणांनी त्यांची नि माझी पुनःपुन्हा भेट होती गेली. स्नेह वृद्धिंगत झाला. आपलेपणा वाढत गेला.

21 जून 2013 रोजी गांधीनगर येथे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीत संखेडा झोपाळ्यावर रंगलेल्या गप्पातील क्षण. शेजारी चि. योगेश जाधव.
21 जून 2013 रोजी गांधीनगर येथे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीत संखेडा झोपाळ्यावर रंगलेल्या गप्पातील क्षण. शेजारी चि. योगेश जाधव.

ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला गुजरातला बोलावलं होतं. मी आणि योगेश आम्ही दोघेही त्यावेळी गुजरातला गेलो होतो. त्या भेटीत त्यांच्याशी खूपच गप्पाटप्पा मारल्या होत्या. का, कुणास ठाऊक; पण तेव्हाच मला वाटलं होतं की, हा माणूस आज ना उद्या देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी तसं मी त्यांना बोलूनही दाखवलं होतं. माझं भाकीत पुढे खरं ठरलं. पुढे पंतप्रधान झाल्यावर जुने स्नेहसंबंध लक्षात घेऊन, ते 'पुढारी'च्या अमृत महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणूनही आले होते. अशा या घट्ट नातेसंबंध असणार्‍या व्यक्‍तिमत्त्वाविषयी लिहिताना मन भरून येणं आणि भारून जाणं ओघानं आलंच!

लोकशाहीचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. इथं तळागाळातला माणूससुद्धा आपल्या कर्तृत्वानं देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो. नरेंद्र मोदी यांच्या बाबतीतही असंच घडलं. लोकशाहीनं कौल दिला आणि एक चहावाला मुलगा देशाचा पंतप्रधान झाला! होय, मोदीजींनी त्यांच्या तरुणपणी आपल्या बंधूसमवेत चहाचं दुकान चालवलेलं आहे. अर्थात, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. मात्र, त्यांच्या नशिबी आयुष्यभर चहाचं दुकान चालवण्याचं मुळीच नव्हतं. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

म्हणूनच कॉलेज शिक्षण घेत असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. 1991 मध्ये कन्याकुमारी ते श्रीनगर अशी एकता यात्रा निघाली होती. त्या यात्रेपासूनच मोदीजींचा खर्‍या अर्थानं राजकारणात प्रवेश झाला. बघता बघता, 1995 मध्ये म्हणजे अवघ्या चारच वर्षांत त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव होण्यापर्यंत मजल मारली. ही खर्‍या अर्थानं त्यांच्या राजकीय जीवनाची नांदीच होती. त्यांच्यावर पाच राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

संघप्रचारक म्हणून काम पाहताना त्यांनी गुजरातमध्ये जबरदस्त जाळं उभं केलं. 1995 आणि 1998 साली झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांत मोदीजींनी आपलं संघटन कौशल्य दाखवून दिलं. त्यामुळेच 2001 मध्ये केशुभाई पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच, मोदीजींच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. 2002 ची विधानसभा निवडणूक त्यांनी सहजगत्या खिशात घातली आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले. त्यानंतर त्यांनी सलग तीनवेळा मुख्यमंत्री होण्याची हॅट्ट्रिक केली!

2001 ते 2014 या तेरा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी गुजरातचा कायापालट करून टाकला. एक नवं मन्वंतर घडवलं. त्यांनी केलेला विकास इतका विलक्षण होता की, गुजरात हे एक विकासाचं मॉडेल म्हणून पुढे आलं. तसेच 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या व्यूहरचनेत मोदीजींचा सिंहाचा वाटा होता. एकेकाळी चहा विकणार्‍या या तरुणानं 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतली! त्यांचा हा प्रवास थक्‍क करणारा आहे.

21 जून 2013 हा दिवस, ज्या दिवशी माझी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी माझ्यासोबत योगेशही होते. खरं तर मी मोदी यांची भेट मागितली होती. आधीचा परिचय होताच. शिवाय दै.'पुढारी'चा संपादक ही बिरुदावलीही तेवढीच महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे मला त्यांची भेट लगेचच मिळाली. भेटीची तारीख कळवताना मला त्यांच्या पी.ए. कडून फोनवरून सांगण्यात आलं की, 'आपली आणि मोदीजींची भेट 21 जून रोजी ठरली आहे. मात्र, आपण गांधीनगरला दोन दिवस आधीच यावे.'

त्यानुसार मी आणि योगेश गांधीनगरला दोन दिवस आधी दाखल झालो. गुजरातचा मोदीजींनी चांगलाच कायापालट घडवलेला. सर्वसामान्यांचं राहणीमान बर्‍यापैकी सुधारलेलं. अशा कितीतरी कल्याणकारी योजनांना आम्ही भेटी दिल्या. त्यांची माहिती करून घेतली. दोन दिवस गुजरात सरकारचा पाहुणचार घेतल्यावर, मोदीजींच्या भेटीचा दिवस उजाडला. त्यांना भेटण्यासाठी आम्ही पंचामृत भवनवर आलो. सुनील देवधर यांनी वेळ ठरवली होती. आम्ही वेळेवर पोहोचलो होतो. आमच्याबरोबर 'पुढारी'चे दिल्‍लीचे प्रतिनिधी श्रीराम जोशी हेही होते. पंचामृत भवनच्या दुसर्‍या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचं दालन होतं.

आम्ही स्वागतकक्षात पोहोचलो. तेवढ्यातच निरोप आला. मुख्यमंत्र्यांची नियोजित भेट पंधरा मिनिटांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे. वेळ पाळणारे म्हणून मोदीजींची ख्याती होती. मग अचानक भेटीची वेळ पुढे का ढकलली, असा प्रश्‍न मला पडला. भिंतीवरच्या घड्याळाचा काटा मिनिटामिनिटानं पुढे जात होता. बरोबर पंधराव्या मिनिटाला मोदीजींच्या दालनाचा दरवाजा उघडला. पाहतो तो, दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी स्वागताला दरवाजात उभे. प्रसन्‍न मुखानं स्वागत करीत त्यांनी आम्हाला त्यांच्या दालनात नेलं. गुजराती माणसाच्या रक्‍तातच आतिथ्य भरलेलं आहे, याची प्रचिती आली.

'माफ करा, तुम्हाला वाट पाहावी लागली. पण मला तुमच्याशी मनसोक्‍त बोलायचं आहे. त्यात अधेमधे कुणाचा अडथळा नको म्हणून सगळ्या भेटी आटोपून घेतल्या. आता आपण निवांत बोलू. वेळेचं बंधन नाही.' बातचीत सुरू होण्याच्या सुरुवातीलाच त्यांनी हसत हसत खुलासा केला आणि मग पाहता पाहता गप्पा रंगल्या. गप्पांचा फडच रंगला म्हणा ना! सुरुवातीला मी त्यांच्याशी हिंदीतून संवाद साधला. परंतु, जेव्हा ते स्वतःच मराठीतून बोलू लागले, तेव्हा मग मीही मराठीतूनच बोलू लागलो. मोदीजींना मराठी उत्तम समजतं आणि बर्‍यापैकी बोलताही येतं.

गप्पांच्या ओघात मी म्हणालो, "आप को गुजरात के लोगों की नब्ज अच्छी तरह से मालूम हो चुकी है। मैं गुजरात में दो-तीन दिन से हूँ। इस दौरान मैंने बहुत सी जानकारी हासिल की है। आपने घंटागाडी शुरू कर दी। गर्भवती महिलाओं के लिए आपने अ‍ॅम्ब्युलन्स की सुविधा भी कर दी है। अगर बेटी पैदा होती है, तो यहाँ उसका धूमधामसे स्वागत किया जाता है और उसे उसके घर पहूँचाने के लिए अ‍ॅम्ब्युलन्स भी दी जाती है। ये सारे रिवाज आप की ही हुकुमत में शुरू हुए है, यह सुनकर बडी खुशी हुई।"
त्यावर हसून मोदीजी म्हणाले, "आप ने तो पुरी जानकारी हासिल की है। आप तो सचमुच के पत्रकार है।" आणि मग ते एकदमच मराठीतून म्हणाले, "आम्ही जनतेचे पुढारी, पण तुम्ही आमचे पुढारी!"

त्यावर सगळेच हसले. मोदीजींनी माझ्याविषयी प्रकट केलेल्या त्या उत्कट भावनांमुळे या भेटीला एक वेगळीच उंची प्राप्‍त झाली. उत्तरोत्तर गप्पा रंगतच गेल्या. गप्पागोष्टीत दोन तास कसे गेले, ते कळलंच नाही. 'रात्रीरेव व्यरंसती' असा 'उत्तररामचरित'मध्ये उल्‍लेख आहे. गप्पा करता करता रात्र कधी उलटली, ते कळलंच नाही, असा त्याचा अर्थ होतो.

चहा-फराळ होत असताना, मोदीजींनी योगेश यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. 'माध्यम व्यवस्थापन' या विषयात योगेश यांची डॉक्टरेट आहे, हे ऐकल्यावर त्यांना योगेशचं खूपच कौतुक वाटलं. ते कौतुकभरल्या सुरात बोलून गेले, 'आप मीडिया के प्रबंधक, हम सरकार के प्रबंधक!' अशा खेळकर वातावरणात गप्पागोष्टी चालू होत्या. वातावरण सैलावलं होतं. अनौपचारिक झालं होतं. राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि ज्ञानापासून विज्ञानापर्यंत अनेक विषयांवर विचारांचं आदानप्रदान होत राहिलं.

मोदीजींनी सलग तिसर्‍यांदा गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं होतं. विजयाची हॅट्ट्रिक केली होती. त्यांच्या या अपूर्व यशाबद्दल मीडियाला मोठंच कुतूहल होतं. त्याच प्रश्‍नाचा पाठपुरावा करीत मी त्यांना विचारलं, "आपल्या यशाचं रहस्य काय?"

"तुमच्यापर्यंत ही माहिती आली आहे!" असं मिश्कीलपणे म्हणत ते पुढे सांगू लागले, "लोकांना काय पाहिजे असतं? आपला विकास व्हावा, हीच त्यांची इच्छा असते. सरकारनं विकासाभिमुख योजना आखाव्यात, ही त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच योजनांचा पूर्ण लाभ गरिबांना आणि तळागाळातील लोकांना मिळावा, अशा रीतीनं योजनांची अंमलबजावणी करण्यावर माझा कटाक्ष असतो. तोच माझा विकासाचा मूलमंत्र!"

ते पुढे म्हणाले, "लोकांची दिशाभूल करणार्‍या योजनांचा भूलभुलैया मी उभा करीत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सरकारी कर्मचार्‍यांत मी शिस्त आणली. त्यासाठी कठोर पावलं उचलली. टीमवर्कला महत्त्व दिलं. सरकारी कर्मचार्‍यांना प्रोत्साहित केलं. आता प्रत्येक कर्मचार्‍याला राज्याच्या विकासाचा ध्यास लागला आहे. इतर राज्यांत तुम्हाला हे चित्र दिसणार नाही."
मोदीजी भरभरून बोलत होते. गुजरातच्या आधुनिक शिल्पकाराचे हे विचार ऐकताना मन प्रसन्‍न होत होतं.
"खरंय! गुजरात भूकंपावेळी आम्ही आपलं प्रशासन कौशल्य जवळून अनुभवलं आहे." मी म्हणालो.

त्यावर लगेचच मोदीजी उद‍्गारले, "तुम्ही केवळ अनुभवलं नाही, तर आम्हाला भरपूर मदतही केलीत. बछाऊ तालुक्यात तुम्ही बांधलेले हॉस्पिटल आजही साक्षीला उभं आहे. गुजराती माणूस एहसान फरामोश नाही. तो तुम्हाला कधीही विसरणार नाही. तशी आम्हाला जगभरातून मदत आली. आम्ही तिचं सूत्रबद्ध नियोजनही केलं. परंतु, तुम्ही केलेली मदत अविस्मरणीय होती. लोक ते लक्षात ठेवतात."
गप्पांच्या ओघात माझ्या मनात दाटून राहिलेला विचार माझ्या ओठांवर आला नि मी पटकन बोलून गेलो,
"पंतप्रधान पदासाठी आपणच योग्य आहात! या निवडणुकीनंतर आपण पंतप्रधान व्हाल, याची मला खात्री वाटते!"
त्यावर ते निर्मळपणे हसून म्हणाले, "मैं तो कॉमन वर्कर हूँ। रेस में नहीं हूँ।" मग निःसंदिग्धपणे उद‍्गारले,
"आपल्या सदिच्छांबद्दल मनापासून आभार! लेकिन दिल्‍ली बहुत दूर हैं।"

मोदीजींच्या या उद‍्गारावर सारे हसले आणि तेही आमच्या हसण्यात सामील झाले. मात्र, याबाबत आपलं मनोगत व्यक्‍त करताना ते म्हणाले, "आपल्याप्रमाणेच अनेकांच्या या भावना आहेत, पण आमचा पक्ष शिस्तबद्ध आहे. इथं कुणाच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षाची शिस्त महत्त्वाची असते. पक्षानं संधी दिली, तर मी ती जबाबदारी पूर्ण शक्‍तिनिशी पार पाडीन."
त्यांचे हे उद‍्गार त्यांच्यातील करारी मनोवृत्तीची आणि निर्धारी स्वभावधर्माची जणू साक्षच देत होते.

'सध्याच्या केंद्रातील सरकारचा लोकांना वीट आलेला आहे,' बोलण्याच्या ओघात त्यांनी आपलं मत नोंदवलं आणि ते नोंदवीत असताना त्यांनी एक सबळ उदाहरणही दिलं, 'उत्तराखंडमधील महापुराच्या आपत्तीवेळी आम्ही तिथे मदतीसाठी पथकं पाठवून दिली, पण काँग्रेस राजवटीनं त्यावर बंदीच घातली!' हे सांगून पुढे त्यावर मल्लिनाथी करताना विषादपूर्ण हसून ते म्हणाले, "असं वाटतं की, काँग्रेसनं माझा धसकाच घेतलाय!" हे सांगतानाच त्यांनी आपलं अत्यंत महत्त्वाचं मत नोंदवलं, 'राजकारण हे निवडणुकीपुरतंच असावं, पाच वर्षे समाजकारण करावं, अशा मताचा मी आहे.'

लोकशाहीची बूज राखणारं हे त्यांचं विधान कालातीत असल्याची जाणीव मला झाली आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला. त्यांच्या शब्दाशब्दांतून कळकळ आणि तळमळ जाणवत होती. मोदीजी केवळ पॉलिटिशियन नाहीत, तर त्यापलीकडे ते एक उत्कृष्ट 'स्टेटसमन'ही आहेत, याची जाणीव होत होती.

गप्पांचा फड रंगलेला असतानाच मी त्यांना 'पुढारी'ची माहिती सांगितली. तेव्हा मला थांबवीत मोदीजी म्हणाले, "पुढारीला कोण ओळखत नाही? अहो, तुम्हाला सारा गुजरात ओळखतो. भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या कच्छमध्ये तुम्ही हॉस्पिटल उभं केलं. या ऐतिहासिक कार्यामुळे 'पुढारी'ला आणि आपल्यालाही सारा गुजराती समाज ओळखतो आणि मनापासून धन्यवादही देतो. शिवाय, महात्मा बापूजींच्याबरोबर 'पुढारी'कार ग. गो. जाधव यांनी काम केलं, हेही आम्हाला ठाऊक आहे!"

बापू म्हणजे महात्मा गांधी. गुजराती माणूस गांधीजींचा उल्‍लेख 'बापू' म्हणूनच करीत असतो. बापू म्हणजे गुजराती भाषेत 'पिता.'
"तुम्ही गुजराती माणसांसाठी अनोळखी नाहीत, हे गुपित मी आज तुम्हाला उघड करतो," असंही ते पुढे म्हणाले.
त्यानंतर त्यांनी सियाचीन हॉस्पिटलची उभारणी, ऊस दर, दूध दरवाढ अशा प्रश्‍नांसाठी 'पुढारी'नं दिलेलं योगदान अशा कार्यांची मनःपूर्वक प्रशंसा केली. एक दुसर्‍या राज्याचा मुख्यमंत्री आपल्या कार्याची नोंद ठेवतो, हे ऐकून माझं मन भरून आलं. मी केवळ 'पुढारी'च्या विकासाकडेच लक्ष दिलं नाही, तर जनतेच्या प्रश्‍नांकडेही लक्ष देऊन ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आलो होतो. मोदीजींनी केलेली प्रशंसा ही एका अर्थानं त्याचीच फलश्रुती होती. तुमच्या कामाची पावती योग्यवेळी, योग्य व्यक्‍तीकडून मिळणे ही अभिमानाचीच गोष्ट असते. साहजिकच मला स्वतःचा अभिमान वाटल्याशिवाय राहिला नाही.

मोदीजींशी माझी विविध विषयांवर चर्चा चालू होती. तेव्हा माझ्या ध्यानी एक गोष्ट आवर्जून आली. ते केवळ वक्‍ते नाहीत, तर उत्तम श्रोतेही आहेत. म्हणूनच मीही सध्याच्या परिस्थितीवर बोलावं, माझीही मतं मांडावीत, अशी त्यांची इच्छा होती आणि ते मला बोलतं करण्याचा प्रयत्न करीत होते. मग त्यांच्या इच्छेचा सन्मान करीत मीही महाराष्ट्रातील राजकीय सद्य:स्थितीचा आढावा घेतला. तसेच भावी दिशा काय नि कशी राहू शकते आणि त्याचे राष्ट्रीय राजकारणावर कशा प्रकारचे पडसाद उमटू शकतात, याबाबतही विवेचन केलं.

तसं करताना, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या राजवटीची तुलना करीत असतानाच मोदीजींच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याच्या यशाचं गमक जसं त्यांनी केलेल्या विकासकामांत आहे, तसेच ते त्यांनी राजकारणाला समाजकारणाची जी जोड दिली, त्यातही दडलेलं आहे, हे मी आवर्जून निदर्शनास आणून दिलं. माझं म्हणणं मोदीजी शांतपणे आणि एकाग्रतेनं ग्रहण करीत होेते.

मोदीजींच्या कार्यकाळात हाती घेण्यात आलेल्या आणि यशस्वीपणे अमलात आलेल्या विविध योजनांचा ऊहापोह मी त्यांच्यासमोर केला. मग तो गरीब कल्याण मेळावा असो वा 108 अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा असो; कन्या केळवणीसारखी हृदयस्पर्शी योजना असो किंवा कृषी महोत्सव, शाळा महोत्सव, खिलखिलाहट आणि आदिवासी विकास योजना असो; या सार्‍या योजनांचा मी आवर्जून उल्‍लेख केला आणि गुजरातच्या या सर्वांगीण विकासाबाबत मोदीजींचं मनापासून कौतुक केलं.

एखाद्या प्रतिष्ठित वृत्तपत्राचा संपादक गुजरातमध्ये येतो काय, तिथल्या कार्याची सर्वंकष माहिती घेतो काय, त्याचा लेखाजोखा मांडतो काय, ही गोष्ट मोदीजींना चांगलीच भावली आणि त्यांनी तसं मला बोलूनही दाखवलं.

एकूणच चर्चेत मोदीजींच्या स्वभावाचं जे दर्शन झालं, ते विलोभनीय होतं. एका खंबीर आणि शिस्तबद्ध व्यक्‍तिमत्त्वाच्या अंतःकरणात जनतेविषयीची सहानुभूती काठोकाठ भरलेली होती. प्रामुख्यानं शेतकर्‍यांबाबतचा कळवळा दिसून येत होता. शेतकर्‍यांसाठी त्यांनी आखलेल्या विविध योजनांची प्रचिती आली. त्याबाबतीत मोदीजींनी दिलेली माहिती विस्मयचकित करणारी होती. एखाद्या सच्चा राजकर्त्यांनं ठरवलं तर एखाद्या प्रश्‍नाचा तो किती बाजूंनी विचार करू शकतो, याचं हे सुंदर उदाहरण.

चर्चा करताना ते म्हणाले, "भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्‍नावर राजकारण करण्यात येतं. खरं तर, शेतकरी म्हणजे केवळ शेताचा मालक नव्हे. एका शेतकर्‍याच्या कुटुंबात जशी माणसं असतात तसेच पशूही असतात; याचा विचार करून, सरकार म्हणून आम्ही शेतकर्‍यांच्या संपूर्ण जीवनाचा सर्वांगीण विचार केला आणि त्याबरहुकूम योजना आखल्या. केवळ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातल्या माणसांसाठीच नव्हे, तर त्यांच्या जनावरांसाठीही योजना आखल्या. केवळ माणसांसाठीच नव्हे, तर पशुंसाठीदेखील अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध केली. इतकेच नव्हे, तर आम्ही गायी-गुरांची सर्व प्रकारची ऑपरेशन्स करतो. कदाचित गुजरात हे देशातीलच नव्हे, तर जगातील पहिलं राज्य असेल की, जेथे जनावरांची लॅप्रोस्कोपी पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात येते."
हे सांगताना मोदीजींचा ऊर अभिमानानं भरून आला होता. जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतल्यामुळे त्याचा राज्याला कसा फायदा झाला, हे सांगताना मोदीजी म्हणाले,

"आज गुजरातच्या दूध उत्पादकांत 86 टक्के वाढ झाली आहे. जनावरांच्या 122 प्रकारच्या रोगांवर यशस्वी उपचार करणारं गुजरात हे एकमेव राज्य आहे."

मनावर घेतलं तर एक राजकारणी सत्ताधीश काय करू शकतो, हे एक संवेदनशील संपादक या नात्यानं मला अचंबित करणारंच होतं.
मोदीजींनी एखादा ध्यास घेतला की, त्याची पूर्तता झाल्याशिवाय ते कधीच थांबत नाहीत. नेमका हाच स्वभाव माझाही. त्यामुळेच आमची दोघांची 'वेव्हलेंग्थ' चांगल्याप्रकारे जुळली. सरदार वल्‍लभभाई पटेल म्हणजे पोलादी पुरुष. अमेरिकेतील न्यूयॉर्क इथे 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' आहे. तो जगातील एकमेव भव्य पुतळा. त्याच तोडीचा सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यासाठी जागाही निश्‍चित केली होती. ती जागा त्यांनी आम्हाला दाखवली.

मला आणि योगेशला त्यांनी आपल्यासमवेत झोपाळ्यावर बसवलं. कौतुकानं फोटोही काढून घेतले. या शिस्तबद्ध व्यक्‍तिमत्त्वामागे तेवढाच मनमोकळेपणाही आहे, याचा सुखद प्रत्यय आला. गप्पा पुढे सुरू राहिल्या. सारा वेळ अनौपचारिक स्नेहभावानं भरून गेला. माझ्या आयुष्यात माझे अनेक राज्यकर्त्यांशी संबंध आले; पण एक यशवंतराव चव्हाण सोडले, तर मोदीजींच्या इतका मनमोकळेपणा मला इतरत्र कुठेच आढळला नाही.
मात्र, आता निरोपाचा क्षण जवळ आला. भावपूर्ण वातावरणात आमच्या भेटीची सांगता झाली. तिथून बाहेर पडताना मोदीजींचं एक ऐतिहासिक विधान माझ्या हृदयात घर करून बसलं होतं.
'माना की अँधेरा घना हैं, लेकिन दिया जलाना कहाँ मना है।'

मोदीजींशी झालेली ही भेट म्हणजे माझ्या 'मर्मबंधातील ठेव' ठरली. अख्ख्या महाराष्ट्रातून मोदीजींना जाऊन भेटणारा मी पहिलाच संपादक होतो. कारण मोदीजी देशाचे पंतप्रधान होतील, याची खात्री त्यावेळेपावेतो कुणालाच पटलेली नव्हती; पण ती मला पटली होती.
अखेर माझा शेरा खरा ठरला! 2014 ची निवडणूक होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यासाठी मी त्यांना फोन केला. तो त्यांच्या पी.ए.नी घेतला. मी त्यांना सांगितलं, 'मोदीजी मोकळे होतील त्यावेळी मला फोन जोडून द्या.' मग त्याच रात्री मला मोदीजींचे पी.ए. संजय भवसार यांचा फोन आला. ते म्हणाले, "कल दस बजे मोबाईल फ्री रखना, मोदीजी बात करेंगे।"

आणि दुसर्‍या दिवशी सकाळी बरोबर दहा वाजता माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मोदीजींचे पी.ए. बोलत होते, "मोदीजी बात करनेवाले है।"
दुसर्‍याच क्षणी मोदीजी फोनवर आले, तसे मी त्यांचं अभिनंदन केलं. त्यावर ते म्हणाले,
"धन्यवाद, जाधवजी!"
"एवढ्या व्यापातून आपण माझी आठवण ठेवलीत, हे आश्‍चर्य आहे." मी आश्‍चर्यानंच म्हणालो. त्यावर ते म्हणाले,
"आप पहले संपादक हो, जिन्होंने मुझे, आप पी.एम. होंगे ऐसे एक साल पहले बताया था। मैं आप को कैसे भूल सकता हूँ?"
त्यावर मी हसून उद‍्गारलो, "आप तो अभी बहुत बडे आदमी बन गये।"
पण ते त्वरित उद‍्गारले, "नहीं, नहीं जाधवजी, मैं तो देश का एक सेवक हूँ।"
मी त्यांना म्हणालो, "आप को किसी की नजर न लग जाये इसीलिए माताजी को नजर उतारने को बोल दीजीए।"
माझ्या बोलण्यावर ते मनमुराद हसले आणि म्हणाले,
"आपने सही कहा।"

संभाषण होतच राहिलं. देशाचे पंतप्रधान वेळात वेळ काढून माझ्याशी गप्पा मारीत होते. जवळजवळ दहा मिनिटं ते माझ्याशी बोलत होते.
बरोबर अकरा महिन्यांपूर्वी मी मोदीजींना, 'आपण पंतप्रधान व्हाल' असं सांगितलं होतं. आपल्या प्रचंड व्यापातही मोदी यांनी ते शब्द अचूक ध्यानात ठेवले. मला अकरा महिन्यांपूर्वीची त्यांची भेट आठवली. तब्बल दोन तास रंगलेल्या दिलखुलास गप्पागोष्टी आठवल्या. त्या भेटीतच उभयतांचे स्नेहबंध (पान 4 वर)
जुळले आणि अतूट झाले.

त्या भेटीनंतरही मोदीजींचे फोन मला येतच असत. मोदीजींना माझ्याशी बोलायचं असल्यास, एक दिवस आधीच त्यांचे सचिव संजय भवसार, जगदीशभाई किंवा हिरेन जोशी हे मला फोन करीत. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता फोन करणार असल्याचा निरोप देत फोन फ्री ठेवावा, अशी सूचना असे. अगदी वेळेवर त्यांचा फोन येई. चर्चेबरोबरच विचारांचं आदानप्रदान होत असे. विशेषतः तत्कालीन राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा होई.
पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतानाच, 'यंदा 'पुढारी'चा अमृत महोत्सव आहे. अमृत महोत्सव सोहळ्याला आपण प्रमुख पाहुणे म्हणून आलं पाहिजे,' असं मी त्यांना निमंत्रणच देऊन टाकलं.
'अवश्य येऊ; निमंत्रण देण्याचा आपला अधिकारच आहे,' असं म्हणून मोदीजींनी लगेचच माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि मनमोकळं हास्य करीत माझ्याविषयी आपल्या मनात किती उत्कट स्नेहभाव आहे, हेच त्यांनी दाखवून दिलं.

आणि मग शब्द दिल्याप्रमाणे ते 'पुढारी'च्या अमृत महोत्सवाला आले. या सोहळ्यातून मी आणि मोदीजी आणखी जवळ आलो. स्नेहबंध अधिकच दृढ झाले. त्यानंतर माझा त्यांना नियमित फोन होत असे. मी दिल्‍लीला गेलो, की त्यांची भेट घेत असे. हा तर आता परिपाठच होऊन बसला होता. मला त्यांच्या भेटीची वेळ लगेचच मिळत असे आणि या भेटीही प्रदीर्घ असत.

अशीच एक भेट 11 ऑगस्ट 2014 ची. नवी दिल्‍लीतील 7, रेसकोर्स रोड, हे पंतप्रधानांचं निवासस्थान. मी योगेशना घेऊन मोदीजींना भेटण्यासाठी गेलो. मी समोर जाताच मोदीजींनी मला दृढालिंगनच दिलं.
'ये आप का ही घर है। यहाँ आप कभी भी आ सकते है।' या त्यांच्या उत्स्फूर्त उद‍्गारातून त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळाच व्यक्‍त होत होता.
करवीरनिवासिनी श्रीअंबाबाईची चांदीची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन मी त्यांचा भावपूर्ण सत्कार केला.
'श्रीअंबाबाई देशाला समृद्धीकडे नेईल,' असे भावोत्कट उद‍्गार मोदीजींनी काढले.
मोदीजींच्या शपथ ग्रहणादिवशी 'पुढारी'नं 'मोदी पर्व' विशेषांक प्रसिद्ध केला होता. तो त्यांना मी भेट दिला. तो पाहून ते चकितच झाले. त्यांचा प्रश्‍न होता की, 'एवढी सारी माहिती तुम्ही कधी आणि कुठून गोळा केलीत?'

या भेटीत आमची महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. मी त्यांना महाराष्ट्रातील घडामोडींची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्रात भाजपच सत्तेवर येईल, अशी मोदीजींना खात्री होती. त्या अनुषंगानं सुमारे अर्धा तास मनमोकळी चर्चा झाली. खरं तर त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं नुकतीच घेतलेली. भेटीगाठी आणि कामांची अगदी भाऊगर्दी. तरीसुद्धा मोदीजींनी माझ्यासाठी खास वेळ काढला. उभयतांतील स्नेहबंध अतूट असल्याची प्रचिती आली.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली. प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला. मोदीजी कोल्हापूर दौर्‍यावर आले. विमानतळावर भेटण्यासाठी त्यांचा मला निरोप आला. मी गेलो. विमानातून उतरताच त्यांनी मला एका बाजूला नेलं. कोल्हापूरच्या ऐरणीवरील प्रश्‍नांविषयी त्यांनी माझ्याकडे चर्चा केली. मी त्यांना माहिती दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज नि बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषणात आवर्जून उल्‍लेख करण्याची सूचना केली.

नंतर मी त्यांचं भाषण टी.व्ही.वर पाहिलं. मला आश्‍चर्य वाटलं. त्यांची स्मरणशक्‍ती जणू टीप कागदासारखीच. अक्षरन्अक्षर ध्यानात ठेवलेलं. आकलनही जबरदस्त. त्यांचे भाषण अत्यंत मुद्देसूद आणि प्रभावी झालं होतं. मी दिलेले मुद्दे त्यांनी चपखलपणे वापरले होते. अशा तर्‍हेनं ते महाराष्ट्रातील मोजक्या व्यक्‍तींशीच बोलतात. त्यात माझाही समावेश आहे, याचा मला अभिमान वाटतो.

दिल्‍लीला गेलो की मला त्यांची त्वरित भेट मिळते. याउलट मंत्र्यांनाही त्यांची लवकर भेट मिळत नाही. मंत्र्यांना त्याचं आश्‍चर्य वाटतं. काही जण तर बोलूनही दाखवतात. पुन्हा त्यांची माझी भेट पंतप्रधान कार्यालयात होत नाही, तर त्यांच्या निवासस्थानी होते. अगदी मर्यादित लोकांनाच त्यांच्या निवासस्थानी भेटण्याची संधी मिळते, अशा निवडक लोकांत माझा समावेश असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा भेटींमध्ये आमची अनेक विषयांवर चर्चा होते. माझ्याकडून ते महाराष्ट्राचा हालहवाला जाणून घेतात. प्रश्‍न विचारतात. वेळ कसा जातो, हे समजत नाही. असे अनेक आनंदाचे क्षण मी माझ्या गाठी बांधलेले आहेत.

2017 मध्ये मोदीजी 'ब्रिक्स' बैठकीला गेले. ती बैठक त्यांनी गाजवली. मी नेमका त्यावेळी दिल्‍लीत होतो. ते परतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला त्यांची वेळ मिळाली. मी आणि योगेश त्यांच्या साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात गेलो. त्या दिवशीची ही भेट तब्बल चाळीस मिनिटं चालली. अनेक विषयांचा ऊहापोह झाला. मी त्यांना सुवर्णाक्षरात लिहिलेली श्रीमद्भगवत्गीतेची दुर्मीळ प्रत भेट म्हणून दिली.

"आपण कर्मयोगी आहात. म्हणूनच मी आपल्याला ही सुवर्णमुद्रित गीता भेट देतोय," मी म्हणालो.
मी त्यांना 'कर्मयोगी' म्हटल्याचं त्यांना खूपच भावलं. खरं तर मी ते ठरवून बोललो नव्हतो. ती माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. स्मितहास्य करीत त्यांनी या संबोधनाला प्रतिसाद दिला आणि सुहास्य वदनानं त्यांनी गीतेचा स्वीकार केला.
"आपले 'ब्रिक्स'च्या यशस्वी दौर्‍याबद्दल अभिनंदन. चीनबरोबर पाकिस्तानलाही आपण वठणीवर आणलं आहे. आपण यापुढे लोहपुरुष म्हणून ओळखले जाल," मी त्यांना म्हणालो.
त्यावर मोदीजींनी पुन्हा एकदा स्मितहास्य केलं.
"गेल्या तीन वर्षांत आम्ही लष्करात आमूलाग्र बदल केले. सीमेवरही आता अधिक खडा पहारा ठेवण्यात आला आहे. त्याचंच हे फळ आहे!" ते विनयानं उद‍्गारले.

या भेटीत चर्चा करताना, मोदीजींनी 'स्वच्छ भारत' अभियानाविषयी अतिशय तळमळीनं आपले विचार मांडले. 'केवळ अस्वच्छतेमुळे गरिबातल्या गरिबाला औषधोपचारासाठी दरवर्षी किमान सहा हजार रुपयांचा फटका बसतो. हे भीषण वास्तव आहे. केवळ गरिबांचेच नाही, तर सर्वसामान्यांचंही अस्वच्छतेमुळे आरोग्य खालावतं. त्यामुळे स्वच्छता अभियान ही आता लोकचळवळ व्हायला पाहिजे,' ते मनापासून बोलत होते.

देशातील प्रश्‍न आणि त्यावरील उपायांबाबत चर्चा करताना मोदीजींच्या बोलण्यात आत्मीयता, तळमळ नेहमीच दिसून येते. 'यदि में नगर निगम का भी अध्यक्ष होता, तो भी उतनी ही मेहनत से काम करता, जितना पी.एम. होते हुए करता हूँ।' या त्यांच्या उद‍्गारानं मला चकित केलं. पंतप्रधान पदावरच्या व्यक्‍तीकडे असलेली ही विनयशीलता पाहून आम्ही थक्‍क झालो.

या भेटीचं औचित्य साधून मी मराठा आरक्षण आणि कोल्हापूर खंडपीठ या प्रश्‍नांवर मोदीजींशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं. 'मराठा आरक्षणासाठी जे एकूण 58 मूकमोर्चे निघाले, त्याची नोंद सर्व जगानं घेतली. खरं तर यावर कोणत्यातरी विद्यापीठानं अभ्यास करून एक श्‍वेतपत्रिकाच काढली पाहिजे,' असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि मूक मोर्चाचं खुल्या अंतःकरणानं कौतुक केलं.
तसेच 'पुढारी'च्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्यावेळी मी जाहीरपणे काही प्रश्‍न उपस्थित केले होेते. त्याची आठवण करून देऊन मी म्हणालो, "त्या प्रश्‍नांपैकी टोल आणि एलबीटी या प्रश्‍नांची सोडवणूक झालेली आहे. शिवाय कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचं कामही मार्गी लागलं आहे."
ते ऐकून मोदीजी खूश झाले. त्यांच्यामुळेच या प्रश्‍नांची सोडवणूक झाली होती. म्हणून मी त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपनं यश मिळवलं. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचं युती सरकार स्थापन होऊन, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. साहजिकच त्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत करायचा विचार पक्षश्रेष्ठींच्या मनात आला. त्यातूनच मे 2015 मध्ये कोल्हापुरात भाजप प्रदेश कार्यकारिणीची तीन दिवसीय राज्य परिषद पार पडली. या परिषदेसाठी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही कोल्हापूरला आले होते. मुळात अमित शहा हे कोल्हापूरचे जावई. भाजपला जे यश मिळालं, त्यात त्यांच्या रणनीतीचा सिंहाचा वाटा होता. अमित शहा हे आक्रमक व्यक्‍तिमत्त्व. भाजपला मिळालेल्या विजयानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेले. साहजिकच त्यांच्याविषयी कोल्हापूरकरांत खूपच उत्सुकता होती.

त्यावेळी अमित शहा यांनी आमच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली. माझ्याबरोबर विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे धागेदोरे त्यांना माहीत करून घ्यायचे होते. ती माहिती त्यांनी माझ्याकडून समजावून घेतली. सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील घडामोडी आणि त्यातील कळीचे मुद्दे त्यांनी समजावून घेतले. माझ्याशी झालेल्या चर्चेतून त्यांना बरीच माहिती मिळाली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, चि. योगेश आणि सौ. गीतादेवीही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे माझ्या कुटुंबीयांशीही त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. 'आपण दिल्‍लीला आलात, की माझ्या घरी अवश्य या,' असं आग्रहाचं निमंत्रणही त्यांनी मला दिलं.

मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांनीही या परिषदेवेळी माझ्या निवासस्थानी भेट दिली. रात्री त्यांनी आमच्याकडे स्नेहभोजनही घेतलं. तेव्हा टोलचा लढा ऐरणीवर आलेला होता. या प्रीतिभोजनाचं औचित्य साधून टोलसह इतरही विविध प्रश्‍न मी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले. तसेच अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडाही मी त्यांना सादर केला. त्यावर, 'टोल लवकरच संपुष्टात आणू आणि तीर्थक्षेत्र आराखड्यालाही मंजुरी देऊ,' अशी ग्वाही त्यांनी दिली.
पंचगंगा प्रदूषण, विमानतळ विस्तारीकरण यावरही आमची सकारात्मक चर्चा झाली. कोल्हापूरच्या प्रश्‍नांचा मला सतत ध्यासच लागलेला. अर्जुनाला जसा पक्ष्याचा फक्‍त डोळाच दिसत असे, तसे मला नेहमीच कोल्हापूरचे प्रश्‍न दिसत असतात. त्यामुळे हे प्रश्‍न मांडायची संधी मी कधीच सोडत नसे. सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळेच अखेर हे प्रश्‍न मार्गी लागले, याचं मला अत्यंत समाधान आहे.

अर्थात ही सारी प्रभावळ मोदीजींच्या व्यक्‍तिमत्त्वाची आहे. माझे नि मोदीजींचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेऊनच इतरांनीही माझ्याशी सलोख्याचे संबंध ठेवलेले आहेत. नरेंद्र मोदी हा एक चमत्कार आहे, असं म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचं अवमूल्यन केल्यासारखं होईल. मोदीजींचं पंतप्रधानपदी विराजमान होणं, हा कुठलाही चमत्कार नसून मोदीजींनी अत्यंत जिद्दीनं, कष्टानं, प्रामाणिकपणानं आणि द्रष्टेपणानं केलेल्या वाटचालीची ती फलश्रुती आहे. अगदी इंचाइंचानं पुढे सरकत त्यांनी गांधीनगर ते नवी दिल्‍ली हा प्रवास करून लाल किल्ल्यावर झेंडा लावलेला आहे, यात शंकाच नाही.
'मजबूत राष्ट्र की नींव रखनी है तो नियत का साफ रखना, इरादे नेक रखना और साथ कुछ कर गुजरने की इच्छाशक्‍ती होनी चाहिए।'
हे त्यांचं विधान त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही.
जुळले आणि अतूट झाले.

त्या भेटीनंतरही मोदीजींचे फोन मला येतच असत. मोदीजींना माझ्याशी बोलायचं असल्यास, एक दिवस आधीच त्यांचे सचिव संजय भवसार, जगदीशभाई किंवा हिरेन जोशी हे मला फोन करीत. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता फोन करणार असल्याचा निरोप देत फोन फ्री ठेवावा, अशी सूचना असे. अगदी वेळेवर त्यांचा फोन येई. चर्चेबरोबरच विचारांचं आदानप्रदान होत असे. विशेषतः तत्कालीन राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा होई.
पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतानाच, 'यंदा 'पुढारी'चा अमृत महोत्सव आहे. अमृत महोत्सव सोहळ्याला आपण प्रमुख पाहुणे म्हणून आलं पाहिजे,' असं मी त्यांना निमंत्रणच देऊन टाकलं.
'अवश्य येऊ! निमंत्रण देण्याचा आपला अधिकारच आहे,' असं म्हणून मोदीजींनी लगेचच माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि मनमोकळं हास्य करीत माझ्याविषयी आपल्या मनात किती उत्कट स्नेहभाव आहे, हेच त्यांनी दाखवून दिलं.

आणि मग शब्द दिल्याप्रमाणे ते 'पुढारी'च्या अमृत महोत्सवाला आले. या सोहळ्यातून मी आणि मोदीजी आणखी जवळ आलो. स्नेहबंध अधिकच द‍ृढ झाले. त्यानंतर माझा त्यांना नियमित फोन होत असे. मी दिल्‍लीला गेलो की, त्यांची भेट घेत असे. हा तर आता परिपाठच होऊन बसला होता. मला त्यांच्या भेटीची वेळ लगेचच मिळत असे आणि या भेटीही प्रदीर्घ असत.

अशीच एक भेट 11 ऑगस्ट 2014 ची. नवी दिल्‍लीतील 7, रेसकोर्स रोड, हे पंतप्रधानांचं निवासस्थान. मी योगेशना घेऊन मोदीजींना भेटण्यासाठी गेलो. मी समोर जाताच मोदीजींनी मला द‍ृढालिंगनच दिलं.
'ये आप का ही घर है। यहाँ आप कभी भी आ सकते है।' या त्यांच्या उत्स्फूर्त उद‍्गारातून त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळाच व्यक्‍त होत होता.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन मी त्यांचा भावपूर्ण सत्कार केला.
'श्री अंबाबाई देशाला समृद्धीकडे नेईल,' असे भावोत्कट उद‍्गार मोदीजींनी काढले.
मोदीजींच्या शपथ ग्रहणादिवशी 'पुढारी'नं 'मोदीपर्व' विशेषांक प्रसिद्ध केला होता. तो त्यांना मी भेट दिला. तो पाहून ते चकितच झाले. त्यांचा प्रश्‍न होता की, 'एवढी सारी माहिती तुम्ही कधी आणि कुठून गोळा केलीत?'

या भेटीत आमची महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. मी त्यांना महाराष्ट्रातील घडामोडींची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्रात भाजपच सत्तेवर येईल, अशी मोदीजींना खात्री होती. त्या अनुषंगानं सुमारे अर्धा तास मनमोकळी चर्चा झाली. खरं तर त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं नुकतीच घेतलेली. भेटीगाठी आणि कामांची अगदी भाऊगर्दी. तरीसुद्धा मोदीजींनी माझ्यासाठी खास वेळ काढला. उभयतांतील स्नेहबंध अतूट असल्याची प्रचिती आली.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली. प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला. मोदीजी कोल्हापूर दौर्‍यावर आले. विमानतळावर भेटण्यासाठी त्यांचा मला निरोप आला. मी गेलो. विमानातून उतरताच त्यांनी मला एका बाजूला नेलं. कोल्हापूरच्या ऐरणीवरील प्रश्‍नांविषयी त्यांनी माझ्याकडे चर्चा केली. मी त्यांना माहिती दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज नि बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषणात आवर्जून उल्‍लेख करण्याची सूचना केली.

नंतर मी त्यांचं भाषण टी.व्ही.वर पाहिलं. मला आश्‍चर्य वाटलं. त्यांची स्मरणशक्‍ती जणू टिपकागदासारखीच. अक्षर न् अक्षर ध्यानात ठेवलेलं. आकलनही जबरदस्त. त्यांचे भाषण अत्यंत मुद्देसूद आणि प्रभावी झालं होतं. मी दिलेले मुद्दे त्यांनी चपखलपणे वापरले होते. अशा तर्‍हेनं ते महाराष्ट्रातील मोजक्या व्यक्‍तींशीच बोलतात. त्यात माझाही समावेश आहे, याचा मला अभिमान वाटतो.

दिल्‍लीला गेलो की, मला त्यांची त्वरित भेट मिळते. याउलट मंत्र्यांनाही त्यांची लवकर भेट मिळत नाही. मंत्र्यांना त्याचं आश्‍चर्य वाटतं. काही जण तर बोलूनही दाखवतात. पुन्हा त्यांची-माझी भेट पंतप्रधान कार्यालयात होत नाही, तर त्यांच्या निवासस्थानी होते. अगदी मर्यादित लोकांनाच त्यांच्या निवासस्थानी भेटण्याची संधी मिळते, अशा निवडक लोकांत माझा समावेश असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा भेटींमध्ये आमची अनेक विषयांवर चर्चा होते. माझ्याकडून ते महाराष्ट्राचा हालहवाला जाणून घेतात. प्रश्‍न विचारतात. वेळ कसा जातो, हे समजत नाही. असे अनेक आनंदाचे क्षण मी माझ्या गाठी बांधलेले आहेत.

2017 मध्ये मोदीजी 'ब्रिक्स' बैठकीला गेले. ती बैठक त्यांनी गाजवली. मी नेमका त्यावेळी दिल्‍लीत होतो. ते परतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला त्यांची वेळ मिळाली. मी आणि योगेश त्यांच्या साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात गेलो. त्या दिवशीची ही भेट तब्बल चाळीस मिनिटं चालली. अनेक विषयांचा ऊहापोह झाला. मी त्यांना सुवर्णाक्षरात लिहिलेली श्रीमद् भगवतगीतेची दुर्मीळ प्रत भेट म्हणून दिली.
"आपण कर्मयोगी आहात. म्हणूनच मी आपल्याला ही सुवर्णमुद्रित गीता भेट देतोय," मी म्हणालो.

मी त्यांना 'कर्मयोगी' म्हटल्याचं त्यांना खूपच भावलं. खरं तर मी ते ठरवून बोललो नव्हतो. ती माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. स्मितहास्य करीत त्यांनी या संबोधनाला प्रतिसाद दिला आणि सुहास्य वदनानं त्यांनी गीतेचा स्वीकार केला.

"आपले 'ब्रिक्स'च्या यशस्वी दौर्‍याबद्दल अभिनंदन. चीनबरोबर पाकिस्तानलाही आपण वठणीवर आणलं आहे. आपण यापुढे लोहपुरुष म्हणून ओळखले जाल," मी त्यांना म्हणालो.
त्यावर मोदीजींनी पुन्हा एकदा स्मितहास्य केलं.
"गेल्या तीन वर्षांत आम्ही लष्करात आमूलाग्र बदल केले. सीमेवरही आता अधिक खडा पहारा ठेवण्यात आला आहे. त्याचंच हे फळ आहे!" ते विनयानं उद‍्गारले.

या भेटीत चर्चा करताना, मोदीजींनी 'स्वच्छ भारत' अभियानाविषयी अतिशय तळमळीनं आपले विचार मांडले. 'केवळ अस्वच्छतेमुळे गरिबातल्या गरिबाला औषधोपचारासाठी दरवर्षी किमान सहा हजार रुपयांचा फटका बसतो. हे भीषण वास्तव आहे. केवळ गरिबांचेच नाही, तर सर्वसामान्यांचंही अस्वच्छतेमुळे आरोग्य खालावतं. त्यामुळे स्वच्छता अभियान ही आता लोकचळवळ व्हायला पाहिजे,' ते मनापासून बोलत होते.

देशातील प्रश्‍न आणि त्यावरील उपायांबाबत चर्चा करताना मोदीजींच्या बोलण्यात आत्मीयता, तळमळ नेहमीच दिसून येते. 'यदि में नगर निगम का भी अध्यक्ष होता, तो भी उतनी ही मेहनत से काम करता, जितना पी.एम. होते हुए करता हूँ।' या त्यांच्या उद‍्गारानं मला चकित केलं. पंतप्रधान पदावरच्या व्यक्‍तीकडे असलेली ही विनयशीलता पाहून आम्ही थक्‍क झालो.

या भेटीचं औचित्य साधून मी मराठा आरक्षण आणि कोल्हापूर खंडपीठ या प्रश्‍नांवर मोदीजींशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं. 'मराठा आरक्षणासाठी जे एकूण 58 मूकमोर्चे निघाले, त्याची नोंद सर्व जगानं घेतली. खरं तर यावर कोणत्यातरी विद्यापीठानं अभ्यास करून एक श्‍वेतपत्रिकाच काढली पाहिजे,' असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि मूक मोर्चाचं खुल्या अंत:करणानं कौतुक केलं.

तसेच 'पुढारी'च्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्यावेळी मी जाहीरपणे काही प्रश्‍न उपस्थित केले होेते. त्याची आठवण करून देऊन मी म्हणालो, "त्या प्रश्‍नांपैकी टोल आणि एलबीटी या प्रश्‍नांची सोडवणूक झालेली आहे. शिवाय कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचं कामही मार्गी लागलं आहे."
ते ऐकून मोदीजी खूश झाले. त्यांच्यामुळेच या प्रश्‍नांची सोडवणूक झाली होती. म्हणून मी त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपनं यश मिळवलं. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचं युती सरकार स्थापन होऊन, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. साहजिकच त्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत करायचा विचार पक्षश्रेष्ठींच्या मनात आला. त्यातूनच मे 2015 मध्ये कोल्हापुरात भाजप प्रदेश कार्यकारिणीची तीन दिवसीय राज्य परिषद पार पडली. या परिषदेसाठी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही कोल्हापूरला आले होते. मुळात अमित शहा हे कोल्हापूरचे जावई. भाजपला जे यश मिळालं, त्यात त्यांच्या रणनीतीचा सिंहाचा वाटा होता. अमित शहा हे आक्रमक व्यक्‍तिमत्त्व. भाजपला मिळालेल्या विजयानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेले. साहजिकच त्यांच्याविषयी कोल्हापूरकरांत खूपच उत्सुकता होती.

त्यावेळी अमित शहा यांनी आमच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली. माझ्याबरोबर विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे धागेदोरे त्यांना माहीत करून घ्यायचे होते. ती माहिती त्यांनी माझ्याकडून समजावून घेतली. सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील घडामोडी आणि त्यातील कळीचे मुद्दे त्यांनी समजावून घेतले. माझ्याशी झालेल्या चर्चेतून त्यांना बरीच माहिती मिळाली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, चि. योगेश आणि सौ. गीतादेवीही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे माझ्या कुटुंबीयांशीही त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. 'आपण दिल्‍लीला आलात की, माझ्या घरी अवश्य या,' असं आग्रहाचं निमंत्रणही त्यांनी मला दिलं.

मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांनीही या परिषदेवेळी माझ्या निवासस्थानी भेट दिली. रात्री त्यांनी आमच्याकडे स्नेहभोजनही घेतलं. तेव्हा टोलचा लढा ऐरणीवर आलेला होता. या प्रीतिभोजनाचं औचित्य साधून टोलसह इतरही विविध प्रश्‍न मी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले. तसेच अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडाही मी त्यांना सादर केला. त्यावर, 'टोल लवकरच संपुष्टात आणू आणि तीर्थक्षेत्र आराखड्यालाही मंजुरी देऊ,' अशी ग्वाही त्यांनी दिली.

पंचगंगा प्रदूषण, विमानतळ विस्तारीकरण यावरही आमची सकारात्मक चर्चा झाली. कोल्हापूरच्या प्रश्‍नांचा मला सतत ध्यासच लागलेला. अर्जुनाला जसा पक्ष्याचा फक्‍त डोळाच दिसत असे, तसे मला नेहमीच कोल्हापूरचे प्रश्‍न दिसत असतात. त्यामुळे हे प्रश्‍न मांडायची संधी मी कधीच सोडत नसे. सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळेच अखेर हे प्रश्‍न मार्गी लागले, याचं मला अत्यंत समाधान आहे.

अर्थात, ही सारी प्रभावळ मोदीजींच्या व्यक्‍तिमत्त्वाची आहे. माझे नि मोदीजींचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेऊनच इतरांनीही माझ्याशी सलोख्याचे संबंध ठेवलेले आहेत. नरेंद्र मोदी हा एक चमत्कार आहे, असं म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचं अवमूल्यन केल्यासारखं होईल. मोदीजींचं पंतप्रधानपदी विराजमान होणं, हा कुठलाही चमत्कार नसून मोदीजींनी अत्यंत जिद्दीनं, कष्टानं, प्रामाणिकपणानं आणि द्रष्टेपणानं केलेल्या वाटचालीची ती फलश्रुती आहे. अगदी इंचाइंचानं पुढे सरकत त्यांनी गांधीनगर ते नवी दिल्‍ली हा प्रवास करून लाल किल्ल्यावर झेंडा लावलेला आहे, यात शंकाच नाही. 'मजबूत राष्ट्र की नींव रखनी है तो नियत का साफ रखना, इरादे नेक रखना और साथ कुछ कर गुजरने की इच्छाशक्‍ती होनी चाहिए।'
हे त्यांचं विधान त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news