सातारा : भात लागण रखडल्याने यंदा उत्पादन घटण्याची भीती

दुष्काळी यादी
दुष्काळी यादी
Published on
Updated on

वाई; धनंजय घोडके : पावसाने जोर न पकडल्याने वाईच्या पश्‍चिम भागात भाताची लागवड लांबली आहे. काही ठिकाणी तर पावसाअभावी भात बियाणे दुबार पेरणीचे संकटही येवून ठेपले आहे. दमदार पाऊस पडल्याशिवाय भाताच्या बियाणाचे तरवे जोमात येत नाहीत, लावण्यायोग्य तरवे झाल्याशिवाय भात लावणीला सुरुवात करण्यात येत नसते. तर यावर्षी पर्जन्यमान योग्य नसल्याने भाताची लागवड लांबणीवर पडून उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

वाईचा पश्‍चिम भाग हा विविध जातीचे भात उत्पादन करणारा भाग असून बासमतीसारख्या भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खरीप हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीला दोन दिवस पाऊस पडल्याने पूरक वातावरण झाले असले तरीही सध्या वाईच्या पश्‍चिम भागात भात लागवडीसाठी पूरक वातावरण नाही. त्यमुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण असून संपूर्ण भाग शेतीची मशागत करून दमदार पावसाची वाट पहात आहे.

भाताच्या विविध प्रजातींमध्ये 370 बासमती, चंडीगड बासमती, पुसा बासमती, दिल्ली राईस, वरंगळ, इंद्रायणी, इंडो अमेरिका, कोलन, काळी कुसळी, इत्यादी भाताच्या प्रजातींचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. वाईच्या पश्चिम भागात 3 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी भात पेरूनही तरवे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट येवू घातले असून योग्य प्रमाणात पाऊस न पडल्यास भाताच्या उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे,

बैल जोडी महाग झाल्याने सध्या या भागात यंत्रावर अवलंबून राहावे लागत आहे. यंत्राच्या सहाय्याने केलेली भात लागण ही कमी वेळात होत असल्याने यंत्रांनाही मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बैल जोडीचा, व बियाणांचा दर गगनाला भिडला असून सध्या सुरु झालेल्या जीएसटीचाही फटका शेतकर्‍यांना बियाणे व खते खरेदीवर झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्‍याला हा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महाबळेश्वरप्रमाणेच वाई तालुक्यात दोन-तीन ठिकानी रंगीत भाताची लागण कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. अतिशय मोहक व सुंदर निसर्गरम्य परिसर ही या भागाची देण असल्याने काम करण्याचा हुरूप व्दिगुणित होतो. या भागातील शेतकरी वारंगुळा करत असल्याने रोजगारांची कमतरता भासत नाही. योग्य पाऊस पडण्याची वाट बळीराजा पहात असून त्यावरच भाताच्या पिकांची भिस्त अवलंबून राहणार आहे.

वाईचा पश्चिम भाग हा संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस वेळेत पडल्यास भातासह खरीप हंगाम व्यवस्थित पार पडतो. समोर धरण असताना धरणातील पाणी उपसण्याची परवानगी नाही, त्यामुळे पावसाळ्यात पडणार्‍या पावसावर या भागातील शेती अवलंबून असते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागतो. जर या भागातील शेतकर्‍यांनी 'पाणी अडवा पाणी जिरवा' ही जलशिवार योजना प्रभावीपणे राबवल्यास पाणी सिंचनाचे काम चांगले होवून भात लागण करण्यासाठी पावसाची वाट पहावी लागणार नाही.
– जितेंद्र गोळे, शेतकरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news