वॉशिंग्टन : अनेक बड्या उद्योजकांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा सामाजिक कार्यांसाठी दान केलेला आहे. त्यामध्ये बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग यांच्यापासून ते अझीम प्रेमजी यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश होतो. प्रख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफे याबाबतही आघाडीवर आहेत. आता त्यांनी आपल्या एका चॅरिटी संस्थेसाठी स्वतःच्या हायटेक पोर्ट्रेटचा लिलाव केला आहे.
या चॅरिटी संस्थेसाठी निधी उभा करण्याच्या हेतूने त्यांनी या हायटेक पोर्ट्रेटचा लिलाव करण्याचे ठरवले. यासाठी आधीच 30 हजार डॉलर्सची बोली (सुमारे 24 लाख रुपये) वर गेली आहे. हे पोर्ट्रेट मोटिव्हा आर्ट फीचर्सने बनवले आहे. यामध्ये शब्दांची ग्रीड बनवली गेली आहे. त्यावर प्रकाश पडताच बफेंचे प्रसिद्ध कोट दिसू लागतात. या आठवड्यात सुरू झालेली ही लिलाव प्रक्रिया बफे यांच्या 92 व्या वाढदिवसानिमित्त 30 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत या हायटेक पोर्ट्रेटला आणखी जास्त किंमत मिळू शकेल असा अंदाज आहे.