फोंडाघाटात सोलापूर येथील तरुणाचा मृतदेह

फोंडाघाटात सोलापूर येथील तरुणाचा मृतदेह
Published on
Updated on

फोंडाघाट; पुढारी वृत्तसेवा : फोंडाघाटातील 25 फूट दरीत मंगळवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. हा मृतदेह अश्पाक राजवल्ली मुलानी (25, सोलापूर) या व्यक्‍तीचा असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अश्पाक हा इस्टेट एजंट म्हणून पुणे येथे काम करत होता. फोंडाघाटात कठड्याला धडकून त्याचा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही स्थानिकांनी घातपाताचा संशय व्यक्‍त केल्याने पोलिस त्यादृष्टीनेही तपास करत आहेत.

मंगळवारी कुजलेल्या मृतदेहाचा वास घाटातून जाणार्‍या पर्यटकांना येऊ लागल्याने त्यांनी दरीत वाकून पाहिले असता संशयास्पद पल्सर मोटारसायकल दिसून आली. याबाबत त्यांनी घाटपायथ्याशी असलेल्या दुकानदारांना कल्पना दिल्यानंतर तेथील काही स्थानिक ग्रामस्थांनी येऊन पाहणी केली असता सुमारे 20 ते 25 फूट खोल दरीमध्ये सडलेल्या अवस्थेत पुरुषाचे प्रेत दिसून आले. त्याचबरोबर बाजूलाच दरीमध्ये मोटारसायकल दिसून आली.

याबाबत ग्रामस्थांकडून कणकवली पोलिसांना खबर देण्यात आली. सकाळी 10 वा.माहिती मिळताच कणकवली पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, एएसआय बापू खरात, पोलिस कॉन्स्टेबल सुप्रिया भागवत यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली.त्यानंतर पंचनामा करुन फोंडाघाटच्या रेस्क्यू टिमच्या मदतीने मृतदेह आणि मोटारसायकल दरीतून बाहेर काढली.

याबाबत माहिती देताना पोलिस उपनिरीक्षक शरद देठे म्हणाले, प्रथमदर्शनी हा अपघातच आहे.घाटाच्या ठिकाणी असलेला कठडा तोडून मोटारसायकलस्वार अश्पाक हा खाली कोसळला. सुमारे आठ ते दहा दिवसापूर्वीची ही घटना आहे. मृतदेहाच्या हातात घड्याळ आणि कडे आढळून आले. तसेच बाजूला कागदपत्र असलेली बॅग आढळली.

मोटारसायकल नंबरवरून आम्ही आरटीओसी संपर्क साधला असता ही मोटारसायकल पुणे येथील असल्याचे स्पष्ट झाले.मात्र मयत हा सेकंड ओनर होता. मूळ मालकाशी संपर्क साधला असता त्याने ही माहिती दिली. आरटीओकडील रेकॉर्डवरुन मृत तरुणाचा नंबर मिळविला. हा तरुण सोलापूर येथील असून मुश्पाक मुलानी असे त्याचे नाव आहे. तो इस्टेट एजंट म्हणून काम करत होता. कामानिमित्त तो पंधरा पंधरा दिवस बाहेर असायचा.पंधरा दिवसापूर्वी तो घरातून बाहेर पडला होता.

तो नेमका काय काम करत होता याची माहिती त्याच्या घरच्यांनाही नाही. मात्र, मिळालेले वर्णन आणि मोटारसायकल यावरुन त्याची ओळख पटली आहे. मात्र, त्याच्या मृतदेहाकडे त्याचा मोबाईल मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.त्याचे नातेवाईक सोलापूरहून कणकवलीस यायला निघाले आहेत. कणकवलीत आल्यानंतरच त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.

दरम्यान, स्थानिकांनी याबाबत घातपाताचा संशय व्यक्‍त केल्याबाबत विचारणा केली असता पोलिसांनी प्रथमदर्शनी हा अपघातच असल्याचे सांगितले. घातपात असता तर 150 ते 200 किलो वजनाची पल्सर मोटारसायकल कुणी उचलून दरीत टाकू शकतो काय? शिवाय कागदपत्रांची बॅगही त्याच्याजवळ मिळाली नसती.कोसळलेला कठडा पाहता हा अपघातच असल्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद देठे यांनी सांगितले. ट्रकला दोरी बांधून मोटारसायकल दरीतून बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास श्री.देठे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news