फोंडाघाट : कारला अचानक आग लागून एकाचा जळून मृत्यू

फोंडाघाट : कारला अचानक आग लागून एकाचा जळून मृत्यू
Published on
Updated on

फोंडाघाट ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकडून फोंडाघाटच्या दिशेने येत असलेली इर्टिका कार अचानक आग लागून पूर्णत: खाक झाली. या कारमध्ये एका व्यक्‍तीचा जळून मृत्यू झाला. मात्र, ती व्यक्‍ती कोण याबाबतचे गूढ कायम आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 वा.च्या सुमारास देवगड-निपाणी राज्यमार्गावर फोंडाघाटात वरच्या बाजूने खिंडीपासून काही अंतरावर एका वळणावर घडली. अपघाताची भीषणता एवढी होती की जळालेल्या व्यक्‍तीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याने त्या व्यक्‍तीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. मात्र, ती गाडी कणकवलीतील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

ही कार गॅसकिटची होती. मात्र, सिलिंडरचा स्फोट झाला की शॉर्टसर्किट झाले याचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. गाडीतील व्यक्‍ती कोल्हापूरकडून फोंडाघाटच्या दिशेने येत होती. फोंडा गावाकडून वर घाटात सुमारे दहा कि.मी. अंतरावर आणि खिंडीपासून खाली दोन कि.मी. अंतरावर या कारने पेट घेतला. कार पेटल्यानंतर चालकाने ती रस्त्याच्या बाजूलाही घेतली. मात्र, आगीचा भडका एवढा होता की त्यात एक व्यक्‍ती जळून मृत्युमुखी पडली.

फोंडाघाट दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार उत्तम वंजारे, महामार्ग पोलिस निरीक्षक अरुण जाधव, हवालदार राजेश ठाकूर, पोलिस नाईक कानबा जारंडे, पोलिस शिपाई नंदकुमार रेडेकर, मृत्युंजय दूत चैतन्य कोरगावकर, सागर चव्हाण आदी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दोन्ही बाजूने वाहने थांबविण्यात आली. मात्र, आगीचा भडका प्रचंड असल्याने कार जळून खाक झाली. या गाडीचा नंबर एम.एच.07-एजी 6297 असा आहे.

या नंबरवरून प्रथमदर्शनी ही कार कणकवलीतील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, त्याची शहानिशा पोलिस करत होते. तसेच गाडीत एका व्यक्‍तीचा जळालेला सांगडा दिसत असून मृत व्यक्‍ती कोण? त्या कार मालकाशी संबंधित कोण आहे का? असल्यास ती व्यक्‍ती कुठे गेली होती? कारला आग नेमकी कशामुळे लागली? यामागे अपघात की आणखी काही कारण याचा तपास पोलिस करत आहेत.

सायंकाळी कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक श्री. देठे व पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. कार उशिरापर्यंत पेटत होती. आतमध्ये एक व्यक्‍ती जळालेली होती. आगीची भीषणता असल्याने केवळ त्या व्यक्‍तीचा सांगाडा होता. त्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पोलिसांनी रात्री जळालेल्या कारचा पंचनामा करत जळालेल्या व्यक्‍तीचा सांगाडा ताब्यात घेतला. मात्र, त्याची ओळख पटण्यासारखी तिथे कोणतीही वस्तू आढळली नाही. घटना समजल्यानंतर अनेकांनी फोंडाघाटात घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक श्री. देठे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news