आयएसआय या गुप्‍तचर यंत्रणेचा भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट

आयएसआय या गुप्‍तचर यंत्रणेचा भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट
Published on
Updated on

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स एजन्सी' (आयएसआय) या गुप्‍तचर यंत्रणेने भारतावर मोठा दहशतवादी हल्‍ला करण्याचा कट रचला आहे. भारतातील स्लीपर सेल्सच्या (पाकिस्तानसाठी काम करणारे स्थानिक भारतीय) माध्यमातून रेल्वेमार्ग उडवून देशांतर्गत संपर्क यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची योजना 'आयएसआय'ने आखलेली आहे. स्वतंत्र खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या माध्यमातून पंजाब आणि लगतच्या भागांतून या कटाच्या अंमलबजावणीची सुरुवात केली जाईल. एकापाठोपाठ मालगाड्या रवाना होतात, असे मार्ग 'आयएसआय'च्या निशाण्यावर आहेत.

पंजाबसह हरियाणा आणि राजस्थानमध्ये यासंदर्भात 'अलर्ट' जारी करण्यात आला असून, सर्व रेल्वेस्थानकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेल्वेमार्गांवरील गस्त वाढविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील नांदेड येथील एकेकाळचा कुख्यात गुन्हेगार हरविंदरसिंग रिंदा हा येथील खून तसेच अन्य गुन्ह्यांत फरारी आहे. रिंदा सध्या पाकिस्तानातील लाहोर येथे असून, 'आयएसआय'शी त्याने संधान साधले आहे. भारतात ठिकठिकाणी आयईडी स्फोटके पुरविण्यासह स्फोट घडविणे आदी दहशतवादी कृत्यांत त्याचे नाव समोर आले आहे. 'आयएसआय'ने फूस लावून पैसा दिल्याने लाहोरमध्ये बसून 'आयएसआय'च्या पंजाबातील सुप्‍त दहशतवाद्यांच्या मदतीने रिंदा हा सारा कट प्रत्यक्षात आणण्याची तयारी करतो आहे.

भारतातील आपल्या हस्तकांना मोठ्या प्रमाणावर 'आयएसआय'कडून पैसा पुरविला जात आहे. दिवसभरापूर्वीच 22 मे रोजी लष्कराने जम्मूतील खूरलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तान्याला अटक केली. कृपाण नवाज असे त्याचे नाव असून, मलिक चक गावचा तो रहिवासी आहे. अखनूर सेक्टरमध्ये त्याने घुसखोरी केली. तो सध्या खूर पोलिसांच्या ताब्यात आहे.

काश्मीरमध्ये उतरविणार 'तालिबान'चे 'भूत'

'आयएसआय' कडून काश्मीरमधील जिहादी शक्‍तींना चिथावणी देणे सुरूच आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताना तेथेच टाकून दिलेली शस्त्रास्त्रे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पुरविली जाऊ शकतात. तालिबानच्या एका गटाला येथे सक्रिय केले जाऊ शकते किंवा काश्मीरमधील आगामी दहशतवादी कृत्यांचे खापर तालिबानवर फोडून स्वत: नामानिराळे राहण्याचा डावही पाकिस्तानकडून खेळला जाऊ शकतो, असे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पंकजकुमार सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

'हिंदूंच्या हत्या रावळपिंडीतून'

काश्मीरमध्ये कुठलीही नवी दहशतवादी संघटना सक्रिय झालेली नाही. काश्मीरमध्ये हिंदूंचे 'टार्गेट किलिंग' पाकिस्तानातील रावळपिंडीतून घडवून आणले जात आहे, असे काश्मीरमधील अधिकार्‍यांच्या बैठकीत आठवडाभरापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन्ही दहशतवादी संघटना लहानसहान टोळ्या बनवून हत्या घडवून आणत आहेत. 'तहरीक-ए-इस्लामी' आणि 'रेसिडेंट फ्रंट' या मुख्य टोळ्या आहेत.

काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवादी

सदैव सतर्क भारतीय सुरक्षा दलांमुळे पाकिस्तानातून होणार्‍या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला चाप बसलेला आहे. काश्मीरमधील स्थानिकांतूनच दहशतवादी निर्माण करण्याचे काम 'आयएसआय'ने सुरू केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढते आहे. 2018 मध्ये 187, 2019 मध्ये 121, 2020 मध्ये 181, 2021 मध्ये 142 आणि 2022 मध्ये 8 मेपर्यंत 28 स्थानिक काश्मिरी युवक दहशतवादी बनले. गेल्या 4 महिन्यांत विविध चकमकींतून 460 वर दहशतवाद्यांचा खात्माही झाला आहे.

रिंदाची नांदेडमधील दहशत!

नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येत रिंदाचा हात वर्षापूर्वी बियाणींकडे रिंदाने केली होती दोन कोटींच्या खंडणीची मागणी रिंदाच्या नावाने अनेकांना धमक्या, खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनाही धमकी रिंदाच्या भीतीने सहा उद्योजक व व्यावसायिकांनी नांदेडमधून काढला पळ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news