कोल्हापूर : आदमापुरात साकारतेय बाळूमामांचे वस्तुसंग्रहालय

कोल्हापूर : आदमापुरात साकारतेय बाळूमामांचे वस्तुसंग्रहालय
Published on
Updated on

मुदाळतिट्टा ; प्रा. शाम पाटील : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा मंदिर परिसरात वस्तुसंग्रहालय आकार घेत आहे. या वस्तुसंग्रहालयात बाळूमामांचा जीवनपट, वापरातील दुर्मीळ वस्तू, पोशाख पाहण्याची संधी भक्‍तांना उपलब्ध होणार आहे. तब्बल 57 लाख 80 हजार रुपये खर्चून हे वस्तुसंग्रहालय या ठिकाणी उभे करण्यात येत आहे. अल्पावधीतच हे वस्तुसंग्रहालय भक्‍तगणांसाठी खुले होणार आहे.

सद‍्गुरू बाळूमामांनी सन 1966 मध्ये आदमापूर येथे समाधी घेतली. त्यानंतर आजपर्यंत या समाधी स्थळाचा तीर्थक्षेत्रांमध्ये विकास झाला. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात तब्बल अठरा कळपांद्वारे त्यांची तीस हजार मेंढरं आज इथे तर उद्या तिथे संचार करत फिरत आहेत. मामांचा भक्‍तगण ही मेंढरं भक्‍तिभावाने सांभाळण्याचे काम करत आहे.

बाळूमामांच्या भक्‍तांना त्यांचा जीवनपट माहिती व्हावा, यासाठी येथे उभारण्यात येणार्‍या वस्तुसंग्रहालयामध्ये त्यांच्या नित्य नियमातील वापरातील दुर्मीळ वस्तू, पोशाख, आहार, रहन -सहन, भांडी, पादुका यांचा समावेश आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रथाचा यामध्ये समावेश आहे. बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर किमान अर्धा तास त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाची द‍ृश्ये भक्‍तांना पाहता यावीत, यासाठी देवालय समितीच्या वतीने दोन मजली भव्य वस्तुसंग्रहालयाची वास्तू या ठिकाणी उभी केली आहे.

ही वास्तू आणि वस्तुसंग्रहालय लवकरच भक्‍तांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. या वास्तूचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम काही महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. एक देखणं, वैशिष्ट्यपूर्ण, चांगलं वस्तुसंग्रहालय पाहण्याची पर्वणीच बाळूमामांच्या भक्‍तांना यानिमित्ताने मिळणार आहे.

जर्मनीतील संग्रहालयात बाळूमामांचा पोशाख

भक्‍तांच्या निवासाची सोय व्हावी, म्हणून तब्बल दोनशे खोल्या असणारे भक्‍तनिवास उभा राहिले. हॉस्पिटलची उभारणी केली गेली. भक्‍तांसाठी अन्‍नछत्राची सोय केली. परदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या भक्‍तिभावाने तीर्थक्षेत्र आदमापुरात येतात. जर्मनीमध्ये उभा करण्यात आलेल्या जगभरातील देवदेवतांच्या दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहालयामध्ये बाळूमामांच्या पोशाखाचा समावेश करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news