अभ्यास समिती : धरणांची उंची वाढवणार, जलसाठे निर्माण करणार

अभ्यास समिती : धरणांची उंची वाढवणार, जलसाठे निर्माण करणार

Published on

नागरी भागातील नैसर्गिक नद्या-नाले निचरा प्रणाली पुनर्स्थापित केली जाणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या पूर नियंत्रणासाठी उपाय योजना राबविण्याबाबत नेमण्यात आलेल्या कृष्णा खोरे पूर अभ्यास समिती यांनी ही शिफारस केली आहे. नवीन जलसाठे निर्माण करण्याबरोबर धरणांची उंची वाढवण्याचीही शिफारस मान्य करण्यात आली आहे.

राज्य शासनाने त्यासह अभ्यास समिती यांनी सूचवलेल्या 18 पैकी 10 शिफारसी पूर्णपणे, पाच शिफारशी अंशत:, एक सुधारणेसह स्वीकारल्या आहेत. दोन शिफारशी फेटाळण्यात आल्या आहेत. कृष्णा खोर्‍यातील पाणी भीमा खोर्‍यात वळवण्याची शिफारस अमान्य करण्यात आली आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदी प्रवाहाचे सरळीकरण करण्याची शिफारस अंशत: स्वीकारण्यात आली आहे. या परिसरात असलेल्या सुपीक जमिनीचा विचार करता पुराची तीव्रता कमी करण्यासाठी बोगद्याद्वारे प्रवाहाचे सरळीकरण करण्याबाबत अभ्यास केला जाणार आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ऑगस्ट 2019 मध्ये महापूर आला होता. या महापुराची कारणे व उपाय योजना याकरिता राज्य शासनाने कृष्णा खोरे पूर अभ्यास समितीची स्थापना केली होती. या समितीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. विविध उपाय योजना, पर्जन्यमानाचे इशारे, प्रत्यक्ष पडलेला पाऊस, जुलै, ऑगस्ट महिन्यातील प्रत्यक्ष परिस्थिती, त्याबाबतची सर्व आकडेवारी, विविध अधिकारी, तज्ज्ञांसमवेत झालेल्या बैठका याद्वारे 18 शिफारसींचा अहवाल राज्य शासनाला सादर केला. यापैकी 11 शिफारसी पूर्ण स्वीकारण्यात आल्या आहेत. पाच शिफारशी अंशत: स्वीकारण्यात आल्या आहेत, तर दोन शिफारशी अमान्य करण्यात आल्या आहेत.

या शिफारसी स्वीकारल्या

  1. पुराची आगाऊ माहिती देणारी अत्याधुनिक यंत्रणा कृष्णा खोर्‍यात बसवणे
  2. पूर नियंत्रण कक्षात जलवैज्ञानिकाची सेवा घ्यावी
  3. हवामान विभागाची क्षमता बळकट करणे
  4. नागरी क्षेत्रातील नैसर्गिक नदी-नाले निचरा प्रणाली पुनर्स्थापित करणे
  5. तलाव, जलाशय पुनर्स्थापित करणे, नैसर्गिक नाल्यांना जोडणे
  6. पूरप्रवण क्षेत्रातील बांधकामावर नियंत्रण ठेवणे व अतिक्रमण काढणे
  7. नदी प्रवाहाला अडथळा येऊ नये म्हणून पूल, कॉजवे, बंधारे यांचे जलशास्त्रीय तपासणी करणे
  8. नवीन जलसाठे निर्माण करणे, सध्याच्या धरणांची उंची वाढवणे, साठवण क्षमता वाढवणे
  9. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, आपत्ती कार्यपालन आराखडा तयार करणे
  10. पूरप्रवण क्षेत्र, पूर पातळी याचे नकाशे तयार करून ते सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून देणे

सुधारणेसह स्वीकृत शिफारशी

1. खोरेनिहाय पूर सनियंत्रण मंडळ स्थापन करणे.

अंशत: स्वीकृत शिफारशी
  1. जलाशय परिचलन आराखडे सुधारित करावे. ते वर्षभर कार्यरत ठेवावे
  2. कृष्णा खोर्‍यातील जलाशय परिचलन एकात्मिक पद्धतीने करावे
  3. मुख्य नदीच्या लांबीत पूररेषेची आखणी करणे
  4. नदी, मोठे नाले रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे, सरंक्षक भिंत बांधणे 5. कृष्णा नदीचे सांगली शहराच्या खालील बाजूस असलेल्या नागमोडी वळणाऐवजी सरळीकरण
अस्वीकृत शिफारशी
  1. कृष्णा खोर्‍यातील पुराचे पाणी भीमा खोर्‍यात वळवणे
  2. धरणांचे निरीक्षण करण्यासाठी नवीन, प्रगत उपकरणे मोठ्या धरणांच्या खोर्‍यात बसविणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news