नाशिक पदवीधर’साठी आज मतदान, १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

नाशिक पदवीधर’साठी आज मतदान, १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ३०) विभागातील पाचही जिल्ह्यांत सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येत आहे. विभागात २ लाख ६२ हजार ७३१ पदवीधर मतदार हे १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील. तत्पूर्वी रविवारी (दि. २९) पाचही जिल्ह्यांतील अधिकारी आणि कर्मचारी हे मतपेटी व साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत असलेली नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मुख्य टप्प्यावर पोहोचली आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने पदवीधरचा सामना सर्वार्थाने वेगळा ठरला आहे. निवडणुकीत प्रचारासाठी सोळाही उमेदवारांनी मागील १५ दिवसांपासून पाचही जिल्हे पिंजून काढले. यावेळी उमेदवारांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. विभागातील एकूण ३३८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी विभागात पदवीधर मतदारांची संख्या २ लाख ६२ हजार ७३१ इतकी आहे. सर्वाधिक मतदार हे नगर जिल्ह्यातील असून, त्यांची संख्या १ लाख १५ हजार ६३८ आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये ६९ हजार ६५२, जळगावला ३५ हजार ५८, धुळ्यात २३४१२, तर नंदुरबारमध्ये १८९७१ मतदार आहेत. हे सर्व मतदार सोमवारी (दि. ३०) त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यापूर्वी विभागातील पाचही जिल्ह्यांतील मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे रविवारी (दि.२९) दुपारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात ९९ मतदान केंद्रे आहेत. जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यदप्रिंप्री येथील गोदामातून अधिकारी व कर्मचारी हे मतदान केंद्रांवर रवाना झाले. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक केंद्र अध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, प्रत्येकी १ शिपाई व पोलिस कर्मचाऱ्याचा त्यात समावेश आहे.

रिंगणातील उमेदवार

रतन बनसोडे, सुरेश पवार, अनिल तेजा, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, अविनाश माळी, इरफान मो इसहाक, ईश्वर पाटील, बाळासाहेब घोरपडे, ॲड. जुबेर नासिर शेख, ॲड. सुभाष जंगले, सत्यजित तांबे, नितीन सरोदे, पोपट बनकर, शुभांगी पाटील, सुभाष चिंधे, संजय माळी.

नाव शोधणे होणार सुलभ

पदवीधर मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे, याबाबत शोध घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक दिली आहे. या लिंकद्वारे मतदारांना आपले नाव शोधणे सुलभ होणार आहे.

मतदान केंद्र

जिल्हा संख्या

नगर १४७

नाशिक ९९

जळगाव ४०

धुळे २९

नंदुरबार २३

एकूण ३३८

हे पुरावे असणार ग्राह्य

मतदानासाठी आधारकार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/खासगी औद्योगिक कंपन्यांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र तसेच केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरित केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र इत्यादींचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले.

– मतदान केंद्राचे वेबकॉस्टिंग, व्हिडिओ शूटिंग

– केंद्रात मतदारांसाठी बीएलओंची नियुक्ती

– प्रत्येक केंद्रावर १ सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूक

– सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत मतदान

– मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news