नानादेव फरांडेबाबांची भाकणूक : ‘कानाने ऐकाल पण डोळ्यांनी पाहणार नाही’

नानादेव फरांडेबाबांची भाकणूक : ‘कानाने ऐकाल पण डोळ्यांनी पाहणार नाही’
Published on
Updated on

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदी भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल बिरदेव यात्रेला आज प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावपातळीवर पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी कार्यक्रम पूर्ण करण्यास परवानगी दिल्याने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत फरांडे बाबांचा हेडाम व भाकणूक सोहळा पार पडला.

आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर करीत प्रमुख मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीतच यात्रेस प्रारंभ झाला. यात्रेतील फरांडेबाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा मंदिरात झाला. यात्रेत भाविकांनी उधळलेल्या भंडाऱ्याने पट्टणकोडोली नगरीच सुवर्णमय झाली. भाकणुकीचा मुख्य कार्यक्रम झाला. अजून चार दिवस यात्रा चालणार आहे.

आज सकाळी परंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम गावचावडीत मानाच्या तलवारीचे पूजन झाले. तलवारीसह प्रकाश पाटील, रणजित पाटील, यांच्यासह, गावडे, कुलकर्णी, जोशी, आवटे, चौगुले, मगदूम आदी मानकरी व धनगर समाजाचे पंच मंडळी हे फरांडेबाबांना भेटण्यासाठी निघाले.

ढोल ताशा वाजत-गाजत भंडाऱ्याच्या उधळणीत ही मिरवणूक भानस मंदिर, कालेश्‍वर मंदिर, श्रींचे मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ दुपारी आली. या गादीवर नानादेव फरांडेबाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर भंडाऱ्याची, लोकर खारीक खोबऱ्याची उधळण करण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात हेडाम खेळतं तलवार पोटावर मारून घेत भाकणुक केली.

भाकणूक अशी-

रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा होईल. तांबड धान्य (मिरची, गूळ, हरबरा) व रस भांड (ऊस) कडक होईल.  कानानं ऐकाल पण डोळ्यानं पाहणारं नाहीसा. माझी सेवा कराल तर मेवा खाशीला सेवा करणाऱ्याला कांबळ्या खाली घेईन. मेंढी वाल्यांची राखण काठी घेऊन मी करेल. सात दिवसांत पाऊस पडेल.

पाच दिवस चालणाऱ्या यात्रेवर कोरोनाच्या निर्बंधांचे सावट जाणवत होते. अंदाजे दहा ते पंधरा कोटींची उलाढाल ठप्प झाली. कोणत्याही प्रकारची खेळण्याची दुकाने, पाळणे करमणुकीचे कार्यक्रम नसल्याने गावांमध्ये यात्रेचे वातावरण जाणवतं नव्हते. पण हुपरी पोलिस स्टेशनचे पंकज गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत पट्टणकोडोली, धनगर समाज पंच कमीटी, तलाठी नागरगोजे यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news