दहिवडी (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडी फलटण रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपाजवळच्या वळणावर स्विफ्ट कार व ट्रकचा भीषण अपघात झाल्याने दहिवडीतील दोघे जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला सातारा येथे उपचार सुरू आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय २२) स्वयम् सुशिल खरात (१६) व अक्षय दीपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास फलटणहून दहिवडीला येत होते. स्विफ्टकार मधून येताना एचपी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर दहिवडीकडून येणाऱ्या ट्रकला त्यांची जोरदार धडक झाली. या अपघातात पियुष व स्वयम् हे दोघे जागीच ठार झाले तर अक्षय गंभीर जखमी झाला. याबाबतची नोंद एवढी पोलिस ठाण्यात झाली असून तपास सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट गाडीचा चक्काचूर झाला तर ट्रक पलटी झाला.