खंडणी उकळणार्‍या दोघांना अटक

खंडणी उकळणार्‍या दोघांना अटक

Published on
पुणे : पुढारी वृत्तसेवा
विमाननगर येथील  विक फील्ड इमारतीमधील बजाज फायनान्स कंपनीत चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्स पुरविणार्‍या व्यक्तीकडे माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी उकळणार्‍या दोघांना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून पकडले. इफराज फिरोज शेख (वय 30, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) आणि तुषार विष्णू आढवडे (वय 36, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांचा साथीदार आसिफ ऊर्फ बबलू युसूफ खान (रा. येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अतुलनगर, वारजे-माळवाडी येथील एका 24 वर्षीय व्यावसायिकाने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. शहरात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पुरवठा करणार्‍यांना गुंडांचा त्रास नेहमीच सहन करावा लागत आहे. इतकेच नाही, तर या कंपन्यांच्या गेटवर गुंडाराज असून, त्यांच्या परवानगीशिवाय पुरवठा करणार्‍या वाहनांना आत सोडले जात नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच खंडणीचे प्रकार बोकाळताना दिसून येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी 15 एप्रिल रोजी दुपारी विक फील्ड इमारतीमधील बजाज फायनान्स कंपनीमध्ये चहा, कॉफीचे मटेरियलचे बॉक्स देण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील गेटवर आरोपींनी फिर्यादींची गाडी अडविली व खंडणीची धमकी दिली. 18 एप्रिल रोजी फिर्यादीने  आसिफ खानला फोन केला. त्याने  प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली. फिर्यादींनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी दुपारी 2 वाजता फिर्यादी 2 हजार रुपयांच्या बनावट नोटेवर 2 पाचशेच्या खर्‍या नोटा घेऊन विक फिल्ड इमारतीच्या आऊट गेटसमोर गेले. तेथे इफराज शेख व तुषार आढवडे पैसे घेण्यासाठी आले होते. त्यांनी फिर्यादीकडून पैसे घेतल्यानंतर तेथे असलेल्या पोलिसांनी दोघांना पकडले. येरवडा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण  अधिक तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विजय गुरव, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदीप गाडे, अमोल पिलाने यांच्या  पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news