रत्नागिरी : रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग ‘समृद्ध’ कधी होणार?

File Photo
File Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतीन गडकरी गुरुवारी नाणीज येथे होणार्‍या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा दौर्‍यावर येत असून मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम खर्‍या अर्थाने रायगड व रत्नागिरीमध्ये रखडले आहे. दरम्यान, त्या मागून जाहीर होऊन समृद्धी मार्गाचा पुणे-नागपूर टप्पा पूर्ण झाला तरी मुंबई-गोवा महामार्गाची लक्षणे लवकर पूर्णत्वाला जातील, अशी दिसत नाहीत. जिल्ह्यातील रखडलेले दोन टप्पे, पुलांची कामे, ओव्हरब्रीज मार्गी लागण्यास आणखी किती वेळ लागणार असा प्रश्न रत्नागिरीकरांना पडला असून ना. नितीन गडकरी यावर नक्कीच मार्ग काढून येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गातील सिंधुदुर्गतील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. रत्नागिरीतील काही टप्पे पूर्ण होत आहेत. कशेळीचा एक बोगदा गणपतीपर्यंत पूर्ण होईल, कशेळी ते परशुराम टप्पा पूर्ण होत आला आहे. परशुराम ते आरवली टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. परंतु आरवली ते बावनदी व बावनदी ते वाकेड या दोन टप्प्यांच्या कामांनी गेल्या तीन-चार वर्षात महामार्गाच्या विकासाचा आलेख 'जाम' करुन टाकला आहे. कधी ठेकेदार, पोटठेकेदार यांच्यामुळे ही कामे रखडली आहेत. आता बऱ्यापैकी या भागात कामे दिसू लागली असली तरी अद्यापही म्हणावा तसा वेग मिळाल्याचे चित्र नाही. लांजा, पाली येथील ओव्हरब्रीजची कामेही संथ गतीने सुरु आहेत. नद्यांवरील पुलांच्या कामालाही गती मिळालेली दिसत नाही. ना. गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग आणि पुलाच्या कामांचा शुभारंभ ज्या सप्तलिंगी नदीवर झाला, ते काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

या महामार्गासाठी ज्या जागांचे भूसंपादन झालेले आहे. त्यामध्ये अद्यापही काहींना मोबदला मिळालेला नाही. त्यासाठी मागणीही केलेली असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे यापूर्वी झालेली पुलाची व रस्त्यांचे अंदाजपत्रकात आता मोठी वाढ झालेली आहे. यासाठी निधी ना. गडकरी यांनी मंजूर केलेला आहे.

रत्नागिरीतील रखडलेल्या दोन टप्प्यामधील ठेकेदार सध्या बदललेले असून, त्याच्या कामांना अपेक्षित गती मिळालेली दिसत नाही. सध्या रत्नागिरीत पाली ते हातखंबा येथील रस्त्याचे काम गतीने सुरु आहे. आरवली ते हातखंबा या रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र, येथील रस्त्याची अवस्था अत्यंत केविलवाणी झालेली दिसून येत आहे.

सन 2021पूर्वी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. त्यानंतर दोन वर्ष उलटून आता एप्रिल 2023 वर्ष आले आहे. त्यामुळे डिसेंबर 2023पर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल असे सांगितले जात असले तरी ते मोठे आव्हान राष्ट्रीय महामार्ग विभागासमोर असून ठेकेदारांकडून कशापध्दतीने काम करुन घेतली जातात हेच आता रत्नागिरीकर नागरिकांना पहायला मिळणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत सोबत येणार आहेत. यावेळी महामार्गातील अडथळे ते ना. गडकरींच्या माध्यमातून सोडवून घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news