कोल्हापूर : अपहरण बीडमध्ये, खून भुदरगडात, तर शिर फेकले गडहिंग्लजमध्ये

निलजी येथे खून प्रकरणातील मृताचे शीर शोधताना आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व पोलिस अधिकारी.
निलजी येथे खून प्रकरणातील मृताचे शीर शोधताना आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व पोलिस अधिकारी.
Published on
Updated on

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : लाव्हरी (ता. केज, जि. बीड) येथील खासगी साखर साखर कारखान्यातील लेबर ऑफिसर सुधाकर चाळक यांच्या खून प्रकरणाचा गुंता वाढला आहे. संशयितांनी शांत डोक्याने मात्र क्रुरपणे हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. संशयितांनी सुधाकर यांचे अपहरण बीड जिल्ह्यातून केले.

त्यानंतर खून भुदरगड तालुक्यात केला, तर शीर गडहिंग्लज तालुक्यात टाकल्याचे तपासात समोर आले आहे. केज पोलिसांनी मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी निलजी (ता. गडहिंग्लज) येथील नदीपात्रात शिर शोधले; मात्र ते सापडू शकले नाही.

केज पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी राजेश पाटील यांनी सांगितले की, मुख्य संशयित दत्तात्रय देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड) याने तुकाराम मुंढे (रा. चारदरी, ता. धारूर) व रमेश मुंढे (रा. पोटबन, ता. वडवणी) यांच्या मदतीने चाळक यांचे बारा लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून अपहरण केले. त्यासाठी मुंढे यांना 25 हजार रुपये देऊ केले. चाळक यांना भुदरगड तालुक्यातील जंगलात डांबून अमानूष मारहाण केली. यातच चाळक यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संशयितांनी मृतदेह महाशिवरात्रीच्या रात्री गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथील पुलावर आणला. मृतदेहाचे सर्व कपडे काढून सत्तूरने शीर धडावेगळे केले. नदीकाठावर त्याचे कपडे जाळून टाकण्यात आले. नायलॉन दोरीने मृतदेहाभोवती चार ते पाच दगड बांधून हिरण्यकेशी नदीत फेकून दिले.

तोडलेले शीर पिशवीत घालून निलजी येथील पुलावरून नदीत फेकून दिले. त्यानंतर गुन्ह्यात वापरलेला सत्तूर हेब्बाळ येथील ओढ्यात टाकण्यात आला. मंगळवारी घटनास्थळावर संशयित देसाई याला पोलिसांनी नेल्यावर त्याने घटनाक्रम कथन केला. नांगनूर पुलावर तपास अधिकारी राजेश पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला.

निलजी पुलावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सुनील कांबळे यांच्या टीममधील दहा जवानांनी शीर शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र अपयश आले. या प्रकरणात आणखी साथीदार असण्याची शक्यता तपास अधिकारी पाटील यांनी व्यक्त केली. पोलिस नाईक अनिल मंदे, दिलीप गीते, संतोष गीते, अरुण पाटील, पोलिसपाटील सतीश काळापगोळ यांनी शोधमोहिमेत सहकार्य केले.

केज पोलिसांना मनःस्ताप

सोमवारी रात्री आठ वाजता चाळक यांचा मृतदेह सापडला तेव्हापासून गडहिंग्लज आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांशी उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांचा पाठपुरावा सुरू होता; मात्र हद्दीच्या कारणावरून वैद्यकीय अधिकार्‍यांनी चालढकल केली. अखेर मंगळवारी दुपारी एक वाजता तब्बल पंधरा तासांनी गडहिग्लज येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह केजला पाठवण्यात आला.

तपासात गोपनियता

सुधाकर चाळक यांच्या हत्येचा केज पोलिस अत्यंत गोपनीय तपास करताना दिसत आहेत. या हत्येची व्याप्ती मोठी आहे. बीड जिल्ह्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. पोलिसांवर राजकीय दबाव वाढत आहे. त्यामुळे गोपनीयता ठेवल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news