अवधूत तटकरेंसह मीरा भाईंदरच्या तीन नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

अवधूत तटकरे
अवधूत तटकरे
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उद्धव ठाकरे शिवसेनेचे युवा नेते व श्रीवर्धनचे माजी आमदार अवधूत तटकरे तसेच मीरा भाईंदरच्या तीन नगरसेवकांनी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मीरा भाईंदरमधील एका काँग्रेस नगरसेवकानेही भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. आमदार अवधूत तटकरेंसह मीरा भाईंदर महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक दीप्ती भट्ट, अनिता पाटील व कुसुम गुप्ता तसेच काँग्रेसचे नगरसेवक नरेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अवधूत तटकरेंचा भाजपा प्रवेश म्हणजे, रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा झटका असून येथून पुढे निश्चितपणे कोकणात त्यांना रोज असे झटके बसणार आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

युतीमध्ये भाजपाने रायगडसह कोकणात शिवसेनेला महत्त्व दिल्यामुळे भाजपाचे संघटन मजबूत झाले नव्हते. आता भाजपा स्वतंत्रपणे संघटना मजबुतीने उभी करत आहे. रायगड, पालघरसह कोकणात सर्वत्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल होत आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकणात सर्वत्र भाजपा कार्यकर्ते उत्साहाने काम करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

अवधूत तटकरे यांनी रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद बारा वर्षे भूषविले होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले होते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news