Shrikant Shinde | नाशिकमध्ये धनुष्यबाणच राहणार

Shrikant Shinde | नाशिकमध्ये धनुष्यबाणच राहणार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात असताना नाशिकमध्ये 'धनुष्यबाण'चा राहणार, असे स्पष्ट करत नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. देशाच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्यासाठी देशात चारशे पार तर राज्यात ४५ प्लस जागा निवडून आणण्याचा निर्धारही शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविला.

भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यावेळी खा. शिंदे बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने नाशिकची भूमी पावन झाली आहे. धनुष्यबाण हे श्रीरामांचे प्रतिक आहे. ते नाशिकमध्येच राहिले पाहीजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरावा, अशी विनवणी खा. हेमंत गोडसे यांनी केली. हा धागा पकडत धनुष्यबाण नाशिकमध्येच राहिल, अशा शब्दांत उपस्थित शिवसैनिकांना आश्वस्त करत नाशिकमधून गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन खा. शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे राज्याच्या विकासासाठी झपाट्याने काम करीत आहे. गेल्या दोन वर्षांतील त्यांनी घेतलेले निर्णय लक्षात घेता उध्दव ठाकरे यांना जयमहाराष्ट्र करण्याचा निर्णय त्यांनी कशासाठी घेतला होता, हे आता सर्वांना कळून चुकले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. गद्दार, खोके, खंजीर असे आरोप केले जात आहेत. परंतु जेव्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तेव्हा ते घरात बसून राहिले नाहीत, अशा शब्दांत खा.शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. अध्योध्येत श्रीराम मंदिराची उभारणी, काश्मिरमध्ये ३७० कलम आणि आता देशात सीएए कायदा लागू करून पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. आगामी निवडणुकांच्या माध्यमातून मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदावर बसविण्यासाठी महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून द्या. हेमंत गोडसे यांना लोकसभेत पुन्हा पाठवा, असे आवाहनही खा. शिंदे यांनी केले.

दुसरे कुणाचेही नाव नाही!
श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये धनुष्यबाणच राहणार, असे स्पष्ट केल्यानंतर सभागृहात 'नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावर दुसरे कोणाचेही नाव नाही, असे सांगत नाशिकच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या अनेक नावांच्या चर्चांना खा. शिंदे यांनी पुर्णविराम दिला. एकनाथ शिंदे जेव्हा उध्दव ठाकरे यांना जयमहाराष्ट्र करत बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर विश्वास टाकून खा. गोडसे उभे होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news