पणजी: पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील ३९ आमदार आमच्यासोबत आहेत. याचा अर्थ ५५ पैकी बहुसंख्य आमदार आमच्या सोबत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले १६ आमदारांपेक्षा आमचा गट मोठा आहे. त्यामुळे आमच्या गट जो व्हीप जारी करेल, तो १६ आमदारांना मान्य करावाच लागेल आणि त्यांना आमच्यासोबत राहावे लागेल. बहुसंख्यांचा गट असतो, त्यालाच विधानसभेत मान्यता असते, असा कायदा असल्याचे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि. ३०) सांगितले. गुवाहाटीमधून आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम आहे. त्यानंतर केसरकर यांनी पत्रकार परिषदेत गटाची भूमिका स्पष्ट केली.
केसरकर म्हणाले की, संजय राऊत हे नेहमीच चुकीचे बोलतात. त्यांनी कमी बोलावे. त्यांनी आमच्या विरोधात महाराष्ट्रातील शिवसैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न केला. आमच्या काही आमदारांच्या कार्यालयावर हल्ला झाला. मात्र, बहुसंख्य शिवसैनिकांना संजय राऊत यांचे बोलणे आवडत नाही. त्यामुळे त्या शिवसैनिकानी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ही चांगली गोष्ट झाली. आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसलेला नाही. २०१९ साली महाराष्ट्रातील जनतेने युतीला बहुमत दिलं होतं. ते बहुमत डावलून ज्यांना पराभूत केलं होतं. त्या राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सरकार स्थापन करणे, हेच पाठीत खंजीर खुपसणे होते. त्यामुळे आम्ही खंजीर खुपसला, असा जो संजय राऊत यांनी आरोप केला आहे, त्या आरोपात तथ्य नसल्याचे केसरकर म्हणाले.
शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता असून शिवसेना आणि भाजप हे सत्तेवर राहणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षापूर्वी भाजप सोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली होती. ती आम्ही पुढे नेत असल्यामुळे बाळासाहेबांचेच विचार आम्ही पुढे नेता आहोत, हे शिवसैनिकांनी लक्षात घ्यावे. असे सांगून सत्तेत असलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हे सत्तेवरून दूर झाले ही शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेमध्ये ठाकरे कुटुंबियांना आमचा विरोध नाही आणि विरोध नसणार. मात्र शिंदे यांच्यामागे ५५ आमदारांचा गट असल्यामुळे एकनाथ शिंदे हेच आमचे नेते असतील, असे सांगून आमचा मुद्दा हा तत्वाचा आहे, हिंदुत्वाचा आहे. शिवसेना वाचवण्याचा आहे. त्यामुळे आम्ही वेगळा गट केला होता. त्यात कुणी वाईट वाटून घेऊ नये. आम्ही पक्षावर दावा केलेला नाही, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलंत का ?